छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीसह सर्वांनाचा मोठा धक्का बसला. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी तुनिषाने हे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. तुनिषाने मालिकेच्या सेटवरच गळफास घेऊन जीवन संपवले. तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिचा ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेतील सह-कलाकार आणि कथित बॉयफ्रेंड शिझान खान याला अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. त्यानंतर आता तिच्या मृत्यूप्रकरणी विविध खुलासे होताना दिसत आहेत.
तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर नुकतंच तिच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. यात काही गंभीर खुलासेही झाले आहेत. तुनिषाने शनिवारी दुपारी मध्यंतरानंतर साडेतीन वाजता शिझानच्या मेकअप रुममध्ये गळफास घेतला. संध्याकाळी ५ वाजता ही बाब समोर आली. तिला वसईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर रात्री उशिरा तिचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जे. जे रुग्णालयात आणण्यात आला. मुंबईतील जे. जे रुग्णालयात रात्री दीड वाजता तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरु झाले. पहाटे ४ वाजेपर्यंत तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. आता तिच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे.
आणखी वाचा : तुनिषा शर्माच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला? कारण आले समोर
तुनिषा शर्माच्या शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी नमूद केल्याप्रमाणे तिचा मृत्यू प्रामुख्याने श्वास गुदमरल्यामुळे झाला आहे. तुनिषा गरोदर असल्याच्या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही. यात ती शक्यता फेटाळून लावण्यात आली आहे. तसेच तुनिषाच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखमी आढळलेली नाही, असेही यात म्हटले आहे. तुनिषाचे १५ दिवसांपूर्वी तिचा सहकलाकार आणि बॉयफ्रेंड शिझान खानबरोबर ब्रेकअप झाला होता. यामुळे ती सेटवर अस्वस्थ असायची. ती नैराश्यात असल्याचेही बोललं जात आहे.
त्याबरोबर मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्मा हिला काही दिवसांपूर्वी हाताला दुखापत झाली होती. यामुळे तिच्या हाताला बांधलेल्या बँडेज पट्टी लावण्यात आली होती. याच बँडेज पट्टीचा वापर तिने गळफास घेण्यासाठी केला.
आणखी वाचा : “तुनिषा शर्माच्या आत्महत्याप्रकरणात लव्ह जिहादचा…” मुंबई पोलिसांनी दिली मोठी माहिती
त्यापुढे ते म्हणाले, तुनिषा शर्मा ही टीव्ही शोमध्ये अभिनेत्री म्हणून काम करत होती. तुनिषा शर्मा आणि शिझान खान यांचे प्रेमसंबंध होते. त्या दोघांचा १५ दिवसांपूर्वी ब्रेकअप झाला होता. त्यानंतर तुनिषाने मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. यानंतर तुनिषाच्या आईने शिझान खानविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी शिझानला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
तसेच तुनिषाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यावर तिचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाला, असे सांगण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपी शिझान आणि तुनिषा या दोघांचा फोन जप्त करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी अद्याप अतिरिक्त प्रेमसंबंध, ब्लॅकमेलिंग किंवा ‘लव्ह जिहाद’ असा कोणताही प्रकार समोर आलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.