Urmila Nimbalkar on depression: उर्मिला निंबाळकरने काही वर्षे अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर तिने आता युट्यूबर म्हणून तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिलांच्या जीवनशैलीशी निगडीत ती अनेक गोष्टीं सोशल मीडियावर शेअर करत असते.

उर्मिला निंबाळकर सध्या यशस्वी युट्यूबरपैकी एक आहे. तिच्या युट्यूब चॅनेलवर ती लाइफस्टाइल,मेकअप आणि ट्रॅव्हल अशा विविध विषयांवर ती व्हिडीओ शेअर करते. मुलींची सुरक्षा, करिअर, आर्थिक गुंतवणूक अशा विषयांवर ती तज्ञांशी गप्पा मारतानादेखील दिसते.सध्या तिला यशस्वी म्हटले जात असले तरी तिच्या आयुष्यात असा एक काळ होता, जेव्हा तिला नैराश्याचा सामना करावा लागला होता.

“खूप मोठ्या प्रमाणात कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये अपयश…”

आता उर्मिलाने नुकतीच लोकमत सखीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती नैराश्यातून कशी बाहेर आली, यावर वक्तव्य केले आहे. उर्मिला म्हणाली, “मला असं वाटतं की प्रत्येकाला कधीतकी खूप मोठ्या प्रमाणात कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये अपयश येतं. अपयशाबद्दल फारसं कोणी बोलत नाही. त्या गोष्टी फार कोणासमोर येत नाहीत. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे आपल्याबरोबरच असं होत आहे. बाकी सगळ्यांचं छान सुरू आहे. ज्या लोकांनी काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण केलं आहे. मग ते सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात असेल, करिअर, अगदी नात्यांमध्ये असेल त्या सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात अपयश पचवलेलं असतं. त्यांच्याकडून चुका झालेल्या असतात. खूप चांगली माणसं त्यांना सोडून गेलेली असतात.

लोकांना त्यांच्याविषयी गैरसमज झालेला असतो. आजार झालेले असतात, अनेक महत्वाच्या गोष्टी गमवाव्या लागतात. त्यानंतर खूप मोठ्या गोष्टी मिळवलेल्या असतात. या सगळ्यातून जावं लागतं. त्याशिवाय यश मिळत नाही. पण, आपल्याकडे कोणी इतकं वास्तववादी सांगत नाही. बऱ्याचदा माध्यम नसतं. भीती, लाज वाटते. का सांगावं,असंही वाटतं. पण, यशस्वी लोकं दु:ख सहन करतात. काबाडकष्ट करतात.

पुढे उर्मिला म्हणाली, “जेव्हा मी नैराश्यातून जात होते. त्यावेळी आपल्याला कळत नाही की त्याची तीव्रता किती आहे. म्हणजे खूप काळ उठावसं वाटायचं नाही. आपण बिनकामाचे असून पृथ्वीवर जड आहोत, असं मला वाटायचं. शून्य वाटायचं. यापुढेही अनेकजण स्वत:ला इजा करून घेतात. अशावेळी तज्ञांची मदत घेतली पाहिजे.

आपल्या मनस्थिती चांगली होण्याची, आपण कोणाचीतरी छान मदत घेऊ शकतो. हे आपण सामान्य करायला पाहिजे. मला प्रल्हाद वामनराव पै यांची मदत झाली. प्रल्हाद दादा स्वत: युथ मेंटॉर आहेत. ते स्वत: काउंसिलिंग घेत असतात. त्यामुळे मला दिशा मिळाली. खूप सकारात्मकता आली. थोरा-मोठ्यांच्या पुस्तकांनी मला खूप मदत केली. स्टोरी टेलवरचे ऑडिओ बुक्स, जीवनविद्येचा युट्यूब चॅनेल मी सतत बघत असायचे. वाईट विचार थोडेही मनात डोकावू नयेत, असं मला वाटलं. त्यामुळे सतत चांगल्या गोष्टी ऐकत राहायचे.

मी सतत सकारात्मक विचारांचा मारा करत राहिले. खूप चांगला कंटेट पाहिला. याबरोबरच, माझं कुटुंब बरोबर होतं. त्यांचा पाठिंबा होता. मी माझा वेळ घेतला आणि या सगळ्यातून बाहेर आले. यातून बाहेर पडता येतं. पण, जेव्हा आपण नैराश्यात असतो, तेव्हा वाटतं की यातून काहीच मार्ग नाही. आपण अडकून पडलो आहे, असं वाटत राहतं.तर ते चूक आहे. तेव्हा जो आघात झालेला असतो, त्यामुळे असंही वाटतो. पण, जेव्हा कोणाची मदत घेतो, तेव्हा आपणच आपल्याला नव्याने भेटतो, असे म्हणत उर्मिलाने ती नैराश्यातून बाहेर कशी पडली हे सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.