Usha Nadkarni on Nikki Tamboli: ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना मराठी चित्रपटांतून जितकी लोकप्रियता मिळाली, तितकीच त्यांना मालिकांमधूनही मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये, हिंदी मालिकांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
चित्रपट, मालिकांबरोबरच उषा नाडकर्णी रिअॅलिटी शोमध्येदेखील दिसल्या आहेत. ‘बिग बॉस मराठी १’, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’, अशा शोमध्ये सहभागी होत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
सेलिब्रिटी मास्टरशेफमधील सहभागी झालेल्या इतर स्पर्धकांबद्दल उषा नाडकर्णी काय म्हणाल्या?
आता उषा नाडकर्णी नुकतीच ‘पिंकविला’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सेलिब्रिटी मास्टर शेफमध्ये सहभागी झालेल्या इतर स्पर्धकांबद्दल वक्तव्य केले. राजीव आदित्य, फैजल शेख, चंदन प्रभाकर, कबिता सिंह, निक्की तांबोळी, गौरव तनेजा, अर्चना गौतम यांच्याबद्दल वक्तव्य केले.
उषा नाडकर्णी म्हणाल्या, “शोमधील सर्व मुले खूप छान होती. विशेषतः राजीव, फैसू, चंदन आणि कबिता हे सगळेजण छान होते. गौरव ठीक होता, तो जास्त कोणाशी बोलत नव्हता. अर्चना गौतम आजूबाजूला असली की मला खूप राग यायचा. आता आम्ही चांगल्या मैत्रीणी आहोत. आमची घरे जवळ आहेत. पण ती शोमध्ये ज्या पद्धतीने बोलायची, हसायची त्याचा मला राग यायचा. मला फालतू गोष्टी आवडत नाहीत.”
“बिग बॉस मराठीमध्येही तुम्ही पाहिले असेल की मी एकटी बसायचे, मला एकटे राहणे आवडते, मला त्याची सवय झाली आहे. आणि शोमध्ये काय व्हायचे की मी मुलांमध्ये जास्त जायचे नाही. त्याच चार-पाच माझ्यापेक्षा वयाने लहान मुली होत्या. मी म्हातारी झाली आहे, त्यांच्यात जाऊन मी काय बोलणार, तर मी एकटी बसायचे.”
निक्की तांबोळीबद्दल उषा नाडकर्णी म्हणाल्या…
निक्की तांबोळीबद्दल विचारले असता उषा नाडकर्णी म्हणाल्या, “तिच्या मते, ती मोठी स्टार आहे. तिच्या नजरेत आपण कोणीही नाही, म्हणून तिच्याबद्दल मी बोलणार नाही. मी मोठ्या लोकांशी जास्त बोलत नाही, कारण ते बोलत नाहीत आणि ती कधीही इतरांच्यात मिसळली नाही.”
तुम्ही बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाला होता, हिंदी बिग बॉसमध्ये सहभागी व्हायला आवडेल का? त्यावर उषा नाडकर्णी म्हणाल्या, “मला याआधीच दोन वेळा बिग बॉस हिंदीची ऑफर आली होती. तेव्हा मी नाही म्हणाले कारण- माझी मालिका सुरू होती. जर मी तो शो सोडून गेले असते, तर एकता कपूर नाराज झाल्या असत्या.”
निक्की तांबोळीबाबत बोलायचे तर ‘बिग बॉस १४’, ‘बिग बॉस मराठी ५’, ‘शिट्टी वाजली रे’, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’, या शोमध्ये सहभागी झाली होती. तसेच, काही म्युझिक व्हिडीओमध्येदेखील दिसली होती. आता आगामी काळात ती कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.