Usha Nadkarni Lives Alone: ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी मराठी रंगभूमीवर खूप काम केलं आहे. अनेक मालिका व चित्रपट करणाऱ्या उषा नाडकर्णी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केल्यानंतर घराघरांत पोहोचल्या. त्या जवळजवळ चार दशकांपासून एकट्या राहत आहेत. स्वतःच मुलगा आपल्याला आई मानत नाही, कारण उषा कामात व्यग्र असताना त्याला त्याच्या आजीने वाढवलं. आता सवय झाल्यामुळे एकटं राहण्याची भीती वाटत नाही, असं उषा नाडकर्णी म्हणाल्या.

उषा नाडकर्णी यांच्या भावाचे अलीकडेच निधन झाले. भावाच्या जाण्याचा उषा नाडकर्णींवर मोठा परिणाम झाला. “मी एकटी राहते. मी उठते, स्वतःसाठी काही जेवण बनवते. मी प्रार्थना करते. मग थोडा वेळ मी फोन स्क्रोल करण्यात आणि आराम करण्यात घालवते. मी फोनवर बोलते, पण मी लहान-लहान गोष्टी करण्यात वेळ वाया घालवत नाही. मी माझ्या नातीला व्हिडीओ कॉल करते,” असं उषा नाडकर्णी पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.

एकटेपणाबद्दल विचारल्यावर उषा म्हणाल्या, “मला एकटेपणाची सवय झाली आहे. मी १९८७ पासून एकटी राहत आहे. आता मला अजिबात भीती वाटत नाही. मी या इमारतीत पहिल्यांदा राहायला आले तेव्हा मला भीती वाटायची. मागून कोणीतरी माझ्यावर हल्ला करेल, अशी मला भीती वाटायची. त्यामुळे मी गार्डला माझ्या दाराजवळ थांबायला सांगायचे. पण आता मला भीती वाटत नाही. लोकांना कसं मरण येईल हे सांगता येत नाही. काही लोक झोपेत जातात, तर काही लोक रुग्णालयात मरतात. मला थोडीही भीती वाटत नाही. जर मी झोपेत मेले तर माझे शेजारी येऊन दार ठोठावतील आणि विचार करतील, ‘म्हातारीने दार नाही उघडलं.'”

उषा नाडकर्णींच्या सर्व भावंडांचे निधन झाले आहे, त्यांच्या भावाचे अलीकडेच निधन झाले. भावाच्या आठवणीत त्यांना अश्रू अनावर झाले. भाऊ पाच वर्षांनी लहान होता, असं त्यांनी सांगितलं. भावाचं घर मोठं होतं आणि उषा कामात व्यग्र होत्या, त्यामुळे मुलगा मामा व आजीबरोबर राहिला. आजीनेच त्याला वाढवलं, असं उषा सांगतात. “वेळ मिळेल तेव्हा मी त्याला भेटायला जायचे. माझं वेळापत्रक ठरलेलं नव्हतं. मराठी नाटकांमध्ये माझा वेळ जायचा. एकाच दिवसात अनेक नाटकं असायची. माझा मुलगा अजूनही मला म्हणतो की मी त्याला फक्त जन्म दिला आहे, त्याची खरी आई आजी (माझी आई) होती,” असं त्या म्हणाल्या.

मी पडले तर कोणालाच कळणार नाही – उषा नाडकर्णी

उषा नाडकर्णी ७८ वर्षांच्या आहेत. काही दिवसांपूर्वी ‘पवित्र रिश्ता’ मधील सह-कलाकार अंकिता लोखंडेशी बोलताना त्यांनी वाढत्या वयानुसार वाटणाऱ्या भीतीबद्दल सांगितलं. “तुला माहीत आहे की मी घरी एकटी असते. मला भीती वाटते की जर मी पडले तर कोणालाही कळणार नाही. गेल्या वर्षी ३० जून रोजी माझ्या भावाचे निधन झाले. माझ्या मनात असे विचार येतात हे त्याला माहीत झालं असतं तर तो माझ्याकडे धावत आला असता. आता, मी कोणाला सांगू?” असं उषा नाडकर्णी भावुक होत म्हणाल्या होत्या.