Usha Nadkarni Talks About Her Daughter In Law : उषा नाडकर्णी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. मराठीसह त्यांनी हिंदीतही अनेक महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. उषा नाडकर्णी नेहमी कुठल्याही मुद्द्यावर स्पष्टपणे त्यांच्या प्रतिक्रिया देत असतात. अशातच आता त्यांनी त्यांच्या सुनेबद्दल सांगितलं आहे.
उषा नाडकर्णी यांनी आजवर मालिका, चित्रपटांत सासूच्या भूमिका साकारल्या आहेत. अशातच आता त्यांनी त्यांच्या खऱ्या सुनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी प्रत्येक सासू ही सून असते असंही म्हटलं आहे. ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल त्यांनी सांगितलं आहे.
उषा नाडकर्णी याबद्दल मुलाखतीत म्हणाल्या, “मला असं वटातं की प्रत्येक सासू ही सून असते. प्रत्येक सासू सून असताना मुलगीही असते. तिचीही आई असते, त्यामुळे मला असं वाटतं की आपली आई जर आपल्या सुनेला समजून घेत असेल, सांभाळून घेत असेल तर आपण का नाही त्यांना समजून घ्यायचं. आपणही त्यांना समजून घेतलं पाहिजे.”
उषा नाडकर्णी यांची सुनेबद्दल प्रतिक्रिया
उषा पुढे म्हणाल्या, “मी जर तुला समजून घेतलं तर तू मला समजून घेशील, यामुळे दुरावा वाढत नाही. आता माझी पण सून आहे, आमच्यामध्ये कधी भांडणं होत नाही. मी जास्त शिकवायला जात नाही, कारण ती पण शिकलेली आहे. ती नोकरी करते. मग मी कशाला तिला शिकवायचं. तिची पद्धत वेगळी असेल. एखाद्या वेळेला आपण सांगतो की असं नाही ग असं ऐकलं तर ठीक आहे, पण जबरदस्ती नाही करायची.”
उषा यांना मुलाखतीत पुढे आई-वडील वयस्कर झाले की बरेच लोक मुलांना त्यांच्याबरोबर राहण्याचा सल्ला देतात याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे असं विचारल्यानतंर त्या म्हणाल्या, “माझं म्हणणं आहे की ज्या आई-वडिलांनी आपल्याला मोठं केलं आहे, आपल्याला सांभाळलं आहे, त्यांच्या पडत्या वयात त्यांना सोडता कामा नये. त्यांना आपल्याबरोबर ठेवलं पाहिजे, कारण आता त्यांची वेळ आली आहे. आमचीही आई होती, मी पण आईकडे जायची. मी तिला म्हणायचे, आई तुझे केस विंचरते. पण, तिला माझ्या भावाचं खूप कौतुक वाटायचं, त्याने तिच्यासाठी खूप केलं.”
उषा नाडकर्णी पुढे त्यांच्या पतीच्या मावशीबद्दल म्हणाल्या, “माझ्या नवऱ्याची मावशी होती, त्या एकट्याच होत्या, मी त्यांना आमच्या घरी आणलं होतं, पण त्या नको नको बोलत होत्या.”
