Utkarsh Shinde : देशभरात आज ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलीवूडसह मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी सुद्धा खास पोस्ट शेअर करत सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. यात लोकप्रिय गायक व अभिनेता उत्कर्ष शिंदेने शेअर केलेल्या एका व्हिडीओ सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.

उत्कर्ष काही दिवसांपूर्वी लेह-लडाखला गेला होता. यावेळी त्याने १८ हजार फूट उंचीवर असलेल्या खारदुंगला याठिकाणी भेट दिली होती. उत्कर्षने भारतीय जवानांना अभिवादन करण्यासाठी या परिसरात तिरंगा घेऊन खास देशभक्तीपर गाणं गायलं होतं. हा व्हिडीओ अभिनेत्याने आज स्वातंत्र्यदिनानिमित्त सोशल मीडियावर शेअर केला आहे.

उत्कर्ष शिंदेची स्वातंत्र्यदिनानिमित्त खास पोस्ट

“देस मेरे मेरी जान है तू…”

५० टक्के ऑक्सिजन, अंगावर बर्फ किंवा कडाक्याचा गारठा असो…आपल्या हातात तिरंगा आल्यावर बर्फातही ४४० चा करंट बसतोच आणि आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारते. लेह-लडाखच्या थ्रिलिंग ट्रेकच अनुभव मला बरंच काही शिकवून गेला. जवळपास १८ हजार फुटांवर हिमवर्षाव होत असताना देशप्रेमापोटी मी गाण्याच्या चार ओळी सादर केल्या.

खारदुंगला (Khardung La ) या भागाला जगातील सर्वात उंच Motorable Pass म्हणून ओळखलं जातं. मी जवळपास १७,५८२ फुटांवर (५,३५९ मीटर) पोहोचलो होतो. हिमवर्षाव सुरूच होता. ४ डिग्री तापमान त्यामुळे प्रचंड गारवा, त्यातही जास्त उंचीमुळे ऑक्सिजनची पातळी खूपच कमी झालेली असते. यामुळे श्वास घेण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. या कठीण परिस्थितीत सुद्धा आपल्या भारतीय सैन्याचे जवान आपल्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतात. रात्रंदिवस आपली सुरक्षा करतात, त्यांचं देशप्रेम, त्यांची देशभक्ती पाहून आपण त्यांच्यासमोर किती लहान आहोत याचा प्रत्यय येतो.

यानंतर मी कारगिलला भेट दिली. मराठा बटालियन, सीआरपीएफ, गोरखा बटालियन आणि अन्य कैक बटालियन… त्यांची कारगिलमधील शौर्य गाथा ऐकून मन खरंच भारावून गेलं. आपल्या सैनिकांनी दिलेली झुंज, त्यांनी दिलेली प्राणाची आहुती, त्यांची हस्तलिखित पत्र वाचून तेच खरे हिरो आहेत, आपल्या भारताचे रिअल स्टार्स आहेत याची जाणीव होते. याठिकाणी गेल्यावर भारतीय सैनिक म्हणजे काय हे खूप जवळून समजलं. आपले सैनिक सीमेवर आहे म्हणून आज आपलं अस्तित्व आहे, भारतीय सैनिक तिकडे लढत आहेत, कठीण परिस्थिती वैऱ्याशी झुंज देत आहेत म्हणून आपण आहोत. एक-एक सैनिक हिमालयासारखा उभा आहे, म्हणून आपण आरामात एसीमध्ये आराम करू शकतोय. आपल्या भारतीय सैनिकांना माझा सलाम! जय जवान जय भारत.

दरम्यान, उत्कर्षच्या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “वाह खरंच सुंदर व्हिडीओ आहे”, “कौतुकास्पद कृती”, “हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल खूप खूप आभार…यामुळे सर्वांना प्रेरणा मिळेल”, “याला म्हणतात देशप्रेम” अशा प्रतिक्रिया उत्कर्षच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.