Vaishnavi Hagawane Death Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वैष्णवी यांचा पती, दीर, सासू-सासरा तसेच नणंद यांना अटक करण्यात आली आहे. ५१ तोळे सोने आणि फॉर्च्यूनर कार हुंडा म्हणून दिल्यानंतरही तिच्या सासरच्या मंडळींनी तिचा छळ काही थांबवला नाही. वैष्णवी यांच्या आई-वडिलांनी केलेल्या आरोपांनुसार वैष्णवी यांना लग्नानंतर सासरच्या लोकांकडून शारीरिक त्रास होत होता.
हुंड्याच्या मागणीसाठी वैष्णवी यांना मारहाण होत होती. याच त्रासातून नंतर त्यांनी स्वत:चं जीवन संपवलं. वैष्णवी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) गटाच्या पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होत्या. त्यामुळे वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर राजकीय क्षेत्रातून अनेक मंडळी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसंच मनोरंजन सृष्टीतूनही या घटनेबद्दल कलाकारांकडून संताप, निषेध तसंच दु:ख व्यक्त केलं जात आहे.
अशातच याप्रकरणी दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सचिन गोस्वामींनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे आणि असं म्हटलं, “’खेळ हुंड्याचा’ या नावाची प्रा. भगवान ठाकूर लिखित एकांकिका मी १९८७ साली केली होती. त्यावेळी हुंडाबळीची समस्या ज्वलंत वाटायची आणि नाटक हे परिवर्तनाचे महत्वाचे साधन वाटायचे. ३८ वर्षे झाली, तरी परिस्थिती आजही तशीच आहे.”
यापुढे त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, “नाटक परिवर्तन घडवतं या भ्रमातून मी मात्र बाहेर आलो आहे. समाजातील तळागाळातील, अशिक्षित घटकात ही कुरीती आहे असे वाटत असतानाच उच्च वर्ग, सुशिक्षित मंडळी ही या व्याधीने ग्रस्त आहेत हे वास्तव बाहेर आलं. सरकार, कायदा,नैतिक जाणीव या सगळ्यांना मुठमाती देऊन घरातील सुनेचा जीव घेतला जातो आणि एक सणसणीत बातमी ते दाबले गेलेले प्रकरण होऊन हा विषय तेवढ्यापुरता संपतो.”
यापुढे त्यांनी “आपण हतबल होऊन मूकपणे हे पाहत राहतो. हे अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे” असं म्हणत दु:ख व्यक्त केलं आहे. दरम्यान, याप्रकरणी अभिनेता हेमंत ढोमेने एक्सवर पोस्ट शेअर ‘महाराष्ट्रात तरी अशा घटना होऊ नयेत म्हणून आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे’ अशी पोस्ट शेअर केली आहे.
तर अभिनेता पुष्कर जोगनेही या घटनेबद्दल राग व्यक्त करत आधी स्वारगेट प्रकरण आता वैष्णवी… आपल्या भगिनी सुरक्षित आहेत का? एका मुलीचा बाप म्हणून भीती वाटते” असं म्हटलं. शिवाय अभिनेत्री अश्विनी महांगडेनेदेखील यावर आताच वचक बसणे गरजेचे आहे म्हणत आरोपींच्या शिक्षा व्हायला हवी अशी मागणी केली आहे.