Vallari Viraj and Indraneil Kamat’s new series: अभिनेत्री वल्लरी विराज ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून घराघरांत पोहोचली. मालिकेतील तिची लीला ही भूमिका चांगलीच गाजली. या मालिकेतील भूमिकेमुळे वल्लरी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती.
‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका वर्षभरातच संपली. या मालिकेनंतर वल्लरी विराज कोणत्या प्रोजेक्टमधून भेटीला येणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. वल्लरीच्या नवीन भूमिकेची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’नंतर अभिनेत्री वल्लरी विराज ‘या’ सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला
वल्लरी विराज एका नवीन शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या शोचे नाव ‘हिट अँड व्हायरल: द रिव्हेंज स्टोरी’ असे आहे. हा शो बुलेट तसेच झी ५ या ॲपवर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये वल्लरीबरोबर अभिनेता इंद्रनील कामतदेखील दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून वल्लरी विराज, आलापिनी निसळ व इंद्रनील कामत अनेकदा एकत्र असल्याचे दिसत होते. ते सोशल मीडियावर काही फोटोदेखील शेअर करत होते. मात्र, या कलाकारांनी ते कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याबद्दल कोणताही खुलासा केला नव्हता.
पोस्टरवर वल्लरी व इंद्रनील कामत दिसत आहेत. या सीरिजमध्ये ते अमान आणि माया या भूमिकांत दिसणार आहेत. आता आलापिनीचीदेखील यामध्ये भूमिका आहे का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वल्लरीने या शोचे पोस्टर शेअर केले आहे, तर इंद्रनील कामतनेदेखील शोमधील एक सीन शेअर करत आमची मायक्रो ड्रामा सीरिज प्रदर्शित झाल्याचे इन्स्टाग्रामवर लिहिले आहे. आता कलाकारांच्या आधीच्या प्रोजेक्टप्रमाणेच या सीरिजमधूनदेखील ते प्रेक्षकांची मने जिंकणार का, प्रेक्षकांचा या सीरिजला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वल्लरी विराज व इंद्रनील कामत दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. फोटो व व्हिडीओ या माध्यमातून ते चाहत्यांच्या भेटीला येतात. इंद्रनील कामतने याआधी ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली होती. वल्लरी व आलापिनी यांचे सोशल मीडियावरील डान्सचे व्हिडीओ लक्ष वेधून घेताना दिसतात.