Vallari Viraj on Navri Mile Hitlerla: ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. मात्र, लवकरच ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी नवरी मिळे हिटलरला या मालिकेत वल्लरी विराज व राकेश बापट हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसत आहेत. त्याबरोबरच भारती पाटील, भूमिजा पाटिल, सानिका काशकर, प्रसाद लिमये, आलापिनी, शर्मिला शिंदे, राजदीप, मिलिंद नंदा असे अनेक कलाकारही प्रमुख भूमिकांत दिसत आहेत.

वल्लरी विराजने या मालिकेत लीला ही भूमिका साकारली आहे. एजेची दुसरी पत्नी असलेली लीला सर्वांची आवडती आहे. लग्नाआधी गोंधळ घालणारी, बेशिस्त लीला व एजेबरोबर लग्न झाल्यानंतरची समजूतदार लीला सर्वांची लाडकी आहे. आपल्या माणसांवर प्रेम करणारी ही लीला प्रेक्षकांच्या मनावरदेखील राज्य करते.

जास्त वाईट याचं वाटत आहे की…

आता नुकतीच ‘टेली गप्पा’ या युट्यूब चॅनेलला मुलाखतीत वल्लरी विराजने या मालिकेबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. वल्लरी विराज म्हणाली, “मी आतापर्यंत जितकं काम केले आहे. त्या प्रोजक्टमधील सगळ्या टीम चांगल्याच होत्या. अमेझॉनची वेब सीरिज स्लम गोल्फची टीम चांगली होती. कन्नी या चित्रपटाचीसुद्धा टीम छान होती आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ची टीम म्हणजे कुटुंब आहोत.”

“मालिका संपतेय याचं कुठेतरी वाईट वाटत आहे. पण, जास्त वाईट याचं वाटत आहे की, मी या लोकांना भेटणार नाही. म्हणजे अगदी स्पॉटदादांपासून मेकअप आर्टिस्टपर्यंत आम्ही सगळेच खूपच एकमेकांशी जोडले गेलोलो आहोत.”

“लीला ही भूमिका मी गेली सव्वा वर्ष साकारत आहे. बाकी सगळ्या भूमिका महिना, दीड महिना किंवा दोन महिने अशा साकारल्या आहेत. त्यानंतर तो प्रोजेक्ट संपतो. त्यामुळ तो बॉण्ड तेवढाच असतो. आता या मालिकेत वर्षभर काम केल्यानं हा अनुभव वेगळाच आहे. या मालिकेत काम केल्यानंतर मला जे प्रेक्षकांकडून प्रेम मिळालं आहे, जो पाठिंबा मिळाला आहे. त्याची कशाशी तुलना होऊ शकत नाही”, असे म्हणत वल्लरी विराजने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता एक वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या मालिकेचा शेवट कसा होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.