Varsha Usgaonkar returns to Colors Marathi: वर्षा उसगांवकरांना मराठी चित्रपटसृष्टीत ‘वंडरगर्ल’ असे संबोधले जाते. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांतही काम केले आहे. याबरोबरच, त्या मराठी मालिकांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात त्या दिसल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या खेळाचे कौतुक झालेले पाहायला मिळाले होते.
आता पुन्हा एकदा वर्षा उसगांवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कलर्स मराठी वाहिनीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये वर्षा उसगांवकर यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, यामध्ये त्यांचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. या व्हिडीओला मी आले त्यांचे गाजलेले गाणे लावले आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करताना आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी, सिनेसृष्टीची सदाबहार अभिनेत्री लवकरच तुमच्या भेटीला येतेय! अशी कॅप्शन दिली आहे.
आता या व्हिडीओवर बिग बॉस मराठी ५ च्या पर्वात सहभागी असणारी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने “वाह! वर्षा ताई”, अशी कमेंट केली आहे. तर अनेक चाहत्यांनीदेखील वर्षा उसगांवकरांना पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. तर अनेकांनी वर्षा उसगांवकरांना फक्त पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दाखवू नका, नवीन शो आणा, अशाही कमेंट केल्या आहेत.

“तुम्हाला टीव्हीवर पाहण्यासाठी उत्सुक आहोत”, “नवीन शो किंवा रिअॅलिटी शो असावा”, “अशोक मा मा मालिकेत तर येणार नाही ना?”, “मराठी सिनेसृष्टीतील चमचमता तारा”, “वंडरगर्ल”, “उगाच पाहुण्या कलाकाराची भूमिका नको”, अशा अनेक कमेंट पाहायला मिळत आहे.



मृणाल साळुंखे म्हणाली…
अशातच आई तुळजा भवानी मालिकेत काम करणारी अभिनेत्री मृणाल साळुंखेने वर्षा उसगांवकर, अशोक सराफ यांना भेटल्यानंतर एक फोटो शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिले, “आज माझ मन भरून पावलं. कारण- माझं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं. पद्मश्री अशोक सराफ सर यांना भेटायची गप्पा मारायची संधी मला मिळाली .
“खरं तर शब्दात हे मांडण अशक्यच पण हा अनुभव मी आजन्म विसरणार नाही. त्यांना भेटणं म्हणजे माझं स्वप्न होतं आणि आज ते पूर्ण झालं. सरांनी इतकं आपलसं करून घेतलं की आम्ही पहिल्यांदा भेटत आहोत अस वाटलंच नाही.”
“वर्षा उसगांवकरयांच्याबरोबरही खूप गोड गप्पा झाल्या. त्या जितक्या सुंदर दिसतात त्याहूनही सुंदर त्यांच व्यक्तिमत्व आहे.
मी त्यांच्या साठी आणलेल्या गजरा आणि सोनचाफ्याच्या फुलांना पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद सुद्धा मी कधीच विसरणार नाही”, असे म्हणत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये वर्षा उसगांवकर व अशोक सराफ एका फ्रेममध्ये दिसत आहेत. त्यामुळे अशोक सराफ काम करत असलेल्या अशोक मा मा या मालिकेत वर्षा उसगांवकर दिसणार का, अशी उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे.