Usha Nadkarni on Nana Patekar and Ankita Lokhande: नाना पाटेकर हे मराठीसह बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहे. त्यांच्या चित्रपटांचा, भूमिकांचा तसेच त्यांच्या संवादांचा मोठा चाहतावर्ग आहे. आजही नाना पाटेकर विविध चित्रपटातून, वेगळ्या धाटणीच्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात.

आता ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी एका मुलाखतीत नाना पाटेकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी कोणत्या चित्रपटात एकत्र काम केले, ते नाना पाटेकरांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता, यावर त्यांनी वक्तव्य केले.

उषा नाडकर्णी यांनी सांगितला नाना पाटेकरांसह काम करण्याचा अनुभव

उषा नाडकर्णी यांनी नुकतीच ‘पिंकविला’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्री नाना पाटेकरांबरोबहर काम करण्याबाबत म्हणाल्या, “पुरुष नाटकात मी नाना पाटेकरांबरोबर काम केले आहे. तसेच, ‘सिंहासन’, ‘महासागर’, ‘यशवंत’मध्ये आम्ही एकत्र काम केले. ‘पक पक पकाक’मध्येदेखील आम्ही होतो, पण, त्यांच्याबरोबर काही सीन नव्हते. ‘यशवंत’ सिनेमातील भूमिकेसाठी नानांनी माझे नाव सुचवले होते. माझी भूमिका छोटी होती. पण मी काम केले होते.”

नाना पाटेकरांबरोबर त्यांचे नाते कसे आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या, “आमचे नाते ठीक आहे. मी त्यांना फोन करत नाही, कारण- ते त्यांच्या कामात व्यग्र असतात. आपण त्यांना फोन करुन कशाला त्रास द्यायचा? आम्ही कुठे भेटलोही नाही.”

नाना पाटेकरांच्या कामाबद्दल बोलायचे तर ते नुकतेच हाऊसफुल ५ चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसले होते. आता आगामी काळात ते कधी व कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उषा नाडकर्णींचे अंकिता लोखंडेबरोबर ‘असे’ आहे बॉण्डिंग

‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी अंकिता लोखंडेबरोबरच्या बॉण्डिंगबद्दल वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, “जेव्हा पवित्र रिश्ता मालिकेला १६ वर्षे पूर्ण झाली तेव्हा तिने मला घरी बोलवले होते. आमचे कधी कधी बोलणे होते.”, असे त्यांनी म्हटले. उषा नाडकर्णी यांची पवित्र रिश्ता मालिकेतील भूमिका चांगलीच गाजली होती. त्यांच्या भूमिकेबद्दल आजही बोलले जाते. अंकिताच्या सासूच्या भूमिकेत त्या दिसल्या होत्या. अंकिता लोखंडे या मालिकेत प्रमुख भूमिकेत होती.

उषा नाडकर्णी आजही विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. त्यांच्या स्पष्टवक्तपेणासाठी त्या ओळखल्या जातात. मालिका, चित्रपटांबरोबरच त्या काही रिअॅलिटी शोमध्येदेखील सहभागी झाल्या होत्या. काही महिन्यांपूर्वीच त्या सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्याआधी बिग बॉस मराठी १ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. आता आगामी काळात त्या कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.