Sharmila Shinde Talks About Marriage : हल्ली बरेच कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. लग्न तेसच लग्नसंस्थेबद्दल अनेक जण वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसतात. अशातच ‘वीण दोघांतली ही तुटेना’ फेम शर्मिला शिंदेने तिची याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शर्मिला शिंदे अलीकडे चर्चेत आली ते तिच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नवीन मालिकेमुळे. त्यामधील तिच्या भूमिकेचं नाव निकिता, असं आहे. शर्मिला सोशल मीडियावरही सक्रिय असते आणि ती अनेकदा विविध गोष्टींबद्दलची तिची मतं स्पष्टपणे मांडत असते. अशातच आता अभिनेत्रीनं नुकतीच (Being Pods)ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिनं लग्नसंस्थेबद्दलची तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

लग्न संस्थेबद्दल शर्मिला शिंदेची प्रतिक्रिया

शर्मिलाला यामध्ये “लग्न या संस्थेबद्दल तुझं काय मत आहे,” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “लग्नसंस्थेबद्दल माझं खूप चांगलं मत आहे. लग्न मला खूप चांगली गोष्ट वाटते, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद वाढला पाहिले. तुम्ही आज जेवढे आनंदी आहात, लग्न केल्यानंतर तो आनंद द्विगुणीत व्हायला हवा. त्यात वाढ व्हायला हवी. लग्न करून आनंद वाढणार असेल, तर लग्न करण्यात अर्थ आहे; पण जर लग्न केल्यानंतर आनंद कमी होणार असेल, तर त्याला काय अर्थ आहे.”

शर्मिला पुढे म्हणाली, “लग्नाबद्दल माझं मत चांगलंच आहे. माझं असं कधीच नव्हतं की, मला लग्नच नाही करायचंय. लग्न झालं तरी मला आनंद आहे. नाही झालं तरी मला आनंद आहे. कारण- त्यातनं जर काही चांगलं मिळणार असेल, तर करायचं. नाही झालं लग्न, तर नाही झालं आणि झालं तर झालं”.

दरम्यान, शर्मिला शिंदे ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेपूर्वी ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून झळकली होती. त्यामध्ये तिनं दुर्गा जहागीरदार ही भूमिका साकारली होती. मालिकेतील तिच्या या भूमिकेनं अनेकांची मनं जिंकली होती. या मालिकेची प्रेक्षकांमध्येही खूप क्रेझ होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला.