Shivani Rangole & Virajas Kulkarni : अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांना मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखलं जातं. या दोघांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ३ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. विराजस आणि शिवानी हे दोघेही लग्नाआधी कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मराठी कलाविश्वातील या आदर्श जोडीने नुकतीच ‘आम्ही सारी खवय्ये- जोडीचा मामला’ या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
‘आम्ही सारी खवय्ये- जोडीचा मामला’ या ‘झी मराठी’च्या कुकिंग शोमध्ये विराजस-शिवानी सहभागी झाले होते. यावेळी शोचा होस्ट संकर्षण कऱ्हाडेने विराजसला शिवानीला प्रपोज करायला सांगितलं. यावेळी विराजस-शिवानीने ‘माझा होशील ना’ या मालिकेच्या टायटल ट्रॅकवर डान्स सुद्धा केला. अभिनेत्रीने जांभळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटचा सुंदर ड्रेस आणि विराजसने पिवळ्या रंगाचा सदरा घातला होता. या दोघांचा रोमँटिक डान्स चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. विराजसने यावेळी त्याच्या बायकोला एकदम हटके स्टाइलमध्ये प्रपोज सुद्धा केलं.
विराजसचं हटके प्रपोजल
विराजस म्हणतो, “शिवानी, ३ वर्षांपूर्वी आपण एकमेकांसाठी वेगवेगळ्या भूमिका स्वीकारल्या होत्या. एका वेगळ्या प्रोजेक्टची सुरुवात केली होती. एक वेगळं कॉन्ट्रॅक्ट साइन केलं होतं. तर, हे कॉन्ट्रॅक्ट तू आता परत ३ वर्षांनी Renew करशील ना? मला धडा शिकवशील ना? आणि महत्त्वाचा प्रश्न खरंच माझी होशील ना?”
विराजसचं प्रपोजल ऐकून शिवानी काहिशी लाजली आणि म्हणाली, “मी या तुझ्या अत्यंत प्रोफेशनल प्रपोजलला खूप प्रोफेशनली, माझ्या मनातून, मनापासून ‘हो’ असं उत्तर देतेय.”
विराजस आणि शिवानीचा हा गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, शिवानीची मुख्य भूमिका असलेल्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेपासून तिची घराघरांत मास्तरीण बाई अशी ओळख निर्माण झाली होती.
तर, अभिनेता विराजस कुलकर्णी सध्या रंगभूमीवर काम करत आहे. ‘वरवरचे वधूवर’ या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन देखील विराजसने केलं आहे.