आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारी विशाखा सुभेदार आता विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. मालिका, चित्रपट, नाटकात ती वेगवेगळ्या भूमिका साकारत आहेत. सध्या तिचं या तिन्ही माध्यमांमध्ये जोरदार काम सुरू आहे. अशा या दमदार अभिनेत्रीचा २२ मार्चला वाढदिवस होता. त्यानिमित्ताने इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी तिला सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हा खास दिवस विशाखा सुभेदारने कशा पद्धतीने साजरा केला? यासंदर्भात तिने नुकतीच पोस्ट शेअर केली आहे.

‘The दमयंती दामले’ या नाटकाच्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांच्या उपस्थित विशाखा सुभेदारचा वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडीओ शेअर करत तिने भली मोठी पोस्ट लिहिली आहे. विशाखाने लिहिलं, “गेल्या अनेक वर्षात असा वाढदिवस झाला नाही. सुरुवात रात्री माझ्या लंडनला असणाऱ्या लेकानं केली. माझ्यासाठी केक पाठवला, मग रात्री तो आम्ही कापला आणि गप्पा मारत मारत त्यावर मी ताव मारला एकटीनंच. खरंतर मी माझ्या लेकाला खूप मिस करत होते. तो माझ्यापासून लांब आहे. आणि मग सकाळ झाली अनेक जणांचे फोन येत होते. दादा, वहिनी, भाचे, जावा, नंदा, दिर, माझ्या घरच्या अन्नपूर्णा, काहींचे फोन घेता आले, तर काही रिसिव्ह नाही करता आले. मग सकाळी माझा नवरा आला. एक सोन्याचं ब्रेसलेट मला गिफ्ट केलं. मज्जाच वाटली मला, खूप जास्त. चक्क त्यांनी मला सरप्राइज दिलं. नाहीतर एरवी काय गिफ्ट घ्यायचं, काय नाही ते सगळं अगदी मला विचारून, मग त्यासाठी पैसे ठेवून, मग ते घेणार. पण यावेळी माझ्या नवऱ्याने सिक्सरच मारला आणि मग त्यानंतर आई घरी आली. तिच्या पाया पडले. औक्षण झालं. माझ्या बाबांचा बॉटल ग्रीन हा आवडता रंग, म्हणून मग त्यांच्या आवडीच्या रंगाचे कपडे घातले. आणि मग निघाले दीनानाथच्या प्रयोगाला.”

“प्रयोगाला सगळ्या नाटकाच्या मंडळींनी खूप छान स्वागत केलं. सगळ्यांनी विश केलं आणि छान प्रेक्षकांच्या सानिध्यात माझा वाढदिवस साजरा झाला. नाटक छान रंगलं. प्रेक्षक सुंदर दाद देत होते. अनेक लोकांनी खूप काय काय गिफ्ट्स आणले होते. खाण्याच्या गोष्टी, काही चॉकलेट, काही वड्या, मँगो बर्फी आणि सगळ्यात जास्त म्हणजे गजरे. मोगऱ्याचे गजरे आणि चाफा… इतका सुगंधी झाला माझा वाढदिवस काल… आणि मग त्यानंतर माझी अतिशय जवळची मैत्रीण अर्चना तिचा नवरा म्हणजे मनजीत, पंढरीनाथ कांबळे, आद्या, ग्रीष्मा, अनिता कांबळे आणि आमचं पिल्लू अस्मि. तिथेच पुष्कर श्रोत्री, अमित राज, क्षितिज पटवर्धन ही मंडळी सुद्धा होती. ते सुद्धा विश करायला आले. गप्पा झाल्या…आम्ही हॉटेलमध्ये मस्त जेवणावर ताव मारला. माझ्या नवऱ्याचा सुद्धा नाटकाचा प्रयोग होता, म्हणून तो बिचारा येऊ शकला नाही. आणि माझा लेक लंडनला. त्या दोघांना मी खूप मिस केलं,” असं विशाखाने लिहिलं आहे.

पुढे विशाखा सुभेदारने लिहिलं, “ग्रीन हाऊस… पार्ले. खूपच चविष्ट जेवण होतं. इथे हॉटेलवाल्यांनी माझ्यासाठी केक अरेंज केला. स्वतः मालक, मालकीण, मुलं, त्यांच्या सूनबाई सगळे माझा वाढदिवस साजरा करायला, मला भेटायला आले. त्यांच्याबरोबर मग केक कापला. त्यांनी हॉटेलमध्ये हॅपी बर्थडेचं गाणं लावलं…आणि त्यांनी मला ट्रीट दिली. त्यांनी माझं बिलच माफ करून टाकलं. इतका सोन्यासारखा वाढदिवस काल झाला माझा, की क्या कहना…प्रेक्षकांच्या सानिध्यात, हशा आणि टाळ्यांच्या आवाजात, मित्र-मैत्रिणींच्या प्रेमात, खूपच कमाल दिवस गेला. मला फेसबूकवर, इन्स्टाग्रामवर ज्या ज्या मंडळींनी, ज्या ज्या रसिक प्रेक्षकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्या सगळ्या मंडळींचे मनापासून आभार! आम्ही कलाकार खरंच खूप भाग्यवान असतो. आयुष्यभराचा आनंद रसिकांच्या प्रेमामुळे आमच्या आयुष्यात आलेला असतो. सगळ्यांचे पुन्हा मनापासून आभार! आणि सगळ्यात शेवटी ज्या परमेश्वराने मला हा दिवस दाखवला, त्या माझ्या देवाचे सुद्धा मनापासून आभार,” असं विशाखा सुभेदारने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विशाखा सुभेदारच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘शुभविवाह’ मालिकेसह चित्रपट आणि नाटकही करत आहे. नुकताच तिचा ‘हार्दिक शुभेच्छा…पण त्याचं काय?’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. पुष्कर जोगच्या या चित्रपटात विशाखाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याशिवाय तिच्या ‘The दमयंती दामले’ या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकात विशाखासह पल्लवी केळकर, सुकन्या काळण, सागर खेडेकर, संजीव तांडेल, वैदेही करमरकर, क्षितिज भंडारी, संजय देशपांडे हे कलाकार पाहायला मिळत आहेत.