‘सात फेरे’ व ‘सरस्वतीचंद्र’ मालिकेत भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारा टीव्ही अभिनेता आशीष कपूरवर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले आहे. आशीषला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यावर आशीषने दिल्लीत हाऊस पार्टीत बोलावलं आणि बाथरूममध्ये बलात्कार केला, तसेच त्याला व्हिडीओही रेकॉर्ड केला असे आरोप महिलेने केले आहेत.
१५ वर्षांपासून मालिकाविश्वात सक्रिय असलेल्या आशीषवर इतके गंभीर आरोप झाल्याने चाहत्यांनाही धक्का बसला आहे. आशीषला अटक केल्याची माहिती पोलिसांनीच दिली आहे. गंभीर आरोप झालेला आशीष कपूर कोण आहे? त्याचं मालिकाविश्वातील करिअर यावर एक नजर टाकुयात.
आशीष कपूरचा जन्म आणि संगोपन दिल्लीमध्ये झालं. शिकत असल्यापासून आशीषचा कल अभिनयाकडे होता. दिल्लीमध्ये राहून त्याने मॉडेलिंग आणि थिएटरमध्ये काम केलं. मॉडेलिंगमुळे त्याला ओळख मिळाली आणि त्यानंतर तो मुंबईत आला. इथे त्याने मालिकाविश्वात नशीब आजमावलं. मायानगरीत आल्यावर सुरुवातीला त्याला संघर्ष करावा लागला. मात्र आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्याने स्वतःला सिद्ध केलं आणि काम मिळवलं.
आशीष कपूरच्या मालिका
आशीष कपूरने २०११ साली ‘दिल जंगल और भी है’ मालिकेतून पदार्पण केलं होतं. पण त्याला स्टार प्लसचा शो ‘देक बंधु… सावधान’ व सोनी टीव्हीवरील ‘ढाई किलो प्रेम’मधून खरी लोकप्रियता मिळाली. नंतर आशीषने ‘देखा एक ख्वाब’, ‘शशश..फिर कोई है’, ‘सात फेरे’ व ‘सरस्वतीचंद्र’ या मालिकांमध्ये काम केलं. त्याने ‘वारिस’मध्येही भूमिका केली होती.

आशीषने ‘देवों के देव… महादेव’ मध्ये काम केलं होतं, पण त्याला खरी लोकप्रियता ‘देखा एक ख्वाब’ मालिकेतून मिळाली. यात त्याने युवराज उदयवीर सिंह हे पात्र साकारले होते. ही मालिका हिट झाली आणि आशीष घराघरांत लोकप्रिय झाला.
दिल्लीत अभिनेता व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या आशीष कपूरने संघर्ष करून मुंबईत यश मिळवलं. पण आता तो वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. एका महिलेने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे, त्यानंतर त्याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. आशीषने दिल्लीत हाऊस पार्टीमध्ये बोलावून बाथरूममध्ये बलात्कार केला, असं महिलेने म्हटलं आहे. पीडित महिला व आशीषची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. सुरुवातीला महिलेने आशीष, त्याचा मित्र व इतर दोन जणांनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता, पण नंतर मात्र तिने जबाब बदलला आणि फक्त आशीषने अत्याचार केल्याचं पोलिसांना सांगितलं.