TMKOC Fame Actress: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. महत्वाचे म्हणजे ही मालिका एक- दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाली नाही, तर गेल्या १७ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे.

या मालिकेत एक गोकुळधाम सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची गोष्ट पाहायला मिळते. मराठी, पंजाबी, गुजराती, केरळ अशी विविध कुटुंबे पाहायला मिळतात. प्रत्येकाचे सण उत्सव मोठ्या धुमधडाक्यात या सोसायटीमध्ये साजरे होतात. इतकेच काय तर येथील रहिवासी नेहमीच जितके एकमेकांच्या आनंदात सहभागी असतात. तितकेच ते इतरांवर आलेल्या संकटाच्या काळात, दु:खाच्या प्रसंगातदेखील तितकेच सहभागी होतात. याबरोबरच या गोकुळधाम सोसायटीमध्ये अनेक गमतीजमतीदेखील घडताना दिसतात.

या मालिकेतील जेठालाल, बापूजी, भिडे मास्तर, माधवी भाभी, रोशन भाभी, सोढी, अय्यर, बबीता, अब्दुल, अंजली भाभी, तारक मेहता, पोपटलाल, बाघा, टप्पू सेना अशी अनेक पात्रे प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या प्रत्येक पात्राची खासियत आहे. आता या सोसायटीमध्ये नुकतीच एका नव्या कुटुंबाची एन्ट्री झाली आहे.

धरती भट्टविषयी जाणून घ्या…

गोकुळधाम सोसायटीमधील हे नवीन कुटुंब हे राजस्थानी आहे. या कुटुंबात रत्नसिंह चतुररसिंह बिंजोला व रूपमती हे पती-पत्नी आणि बंसरी व वीर ही त्यांची मुले आहेत. अभिनेत्री धरती भट्टने रुपमती ही भूमिका साकारली आहे. तर अभिनेता कुलदीप गौरने रत्नसिंह ही भूमिका साकारली आहे. आता जाणून घेऊयात धरती भट्टविषयी…

धरती भट्टने २०१२ साली ‘लव्ह मॅरेज या अरेंज मॅरेज’ या शोमधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर अभिनेत्रीने ‘जोधा अकबर’, ‘महिसागर’ या मालिकांमध्ये भूमिका साकारत वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेत्रीने ‘वो तो है अलबेला’ आणि ‘क्या हाल मिस्टर पांचाल?’, ‘शक्ती- अस्तित्व के अहसास की’ या मालिकांमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले. हे कार्यक्रम मोठे लोकप्रिय ठरले होते.

धरतीच्या भूमिकांबद्दल बोलायचे तर तिने कुठल्याही एकाच जॉनरच्या भूमिका साकारल्या नाहीत. तर तिने विविध धाटणीच्या विविध भूमिका साकारल्या. मात्र, तिला मोठी लोकप्रियता मिळण्यात तितके यश मिळाले नाही. आता तारक मेहता..’, शोमधून अभिनेत्रीला वेगळी ओळख मिळणार का, तिला लोकप्रियता मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील सक्रिय आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी तिची ओळख आहे. आता तारक मेहता शोमध्ये तिची एन्ट्री झाल्यानंतर ती बबिताला म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ताला टक्कर देईल, अशी चर्चा रंगली आहे.

दरम्यान, आता गोकुळधाम सोसायटीमध्ये नवीन कुटुंबाच्या आगमनाने ‘तारक मेहता…’ मध्ये काय ट्विस्ट पाहायला मिळणार, काय गमती जमती घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.