छोट्या पडद्यावरील अवधूत गुप्तेचा लोकप्रिय कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ हा पुन्हा सुरू होत आहे. आजपासून सुरु होणाऱ्या कार्यक्रमाचे हे तिसरे पर्व आहे. या कार्यक्रमाचे यापूर्वीचे दोन्ही पर्व चांगलेच गाजले होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाबाबत सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता आहे. या तिसऱ्या पर्वाच्या पहिल्या भागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी राजकारणाबरोबच व्यक्तिक आयुष्यावरही मनमोकळा संवाद साधला आहे.




राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात संवाद साधताना स्वतःला आणि इतरांना खुपणाऱ्या गोष्टींवरही भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांचे भाऊ जयदेव ठाकरे यांनी फोनच्या माध्यमातून या कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे हुशार आहेत. त्यांच्याकडे अनेक योजना आहेत. अनेक प्रकल्प आहेत मात्र, असं असूसुद्धा जनता यांना वाव का देत नाही. त्यांना एक संधी का देत नाही? असा प्रश्न जयदेव ठाकरेंनी राज ठाकरेंना विचारला. या प्रश्नाचं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.
ते म्हणाले, जो प्रश्न जयदेव ठाकरेंना पडला आहे तोच मला पडला आहे. गेल्यावर्षी शिवसेनेतून ४० आमदार बाहेर पडून त्यांनी याच पक्षाचा दुसरा गट तयार केला. ही घटना म्हणजे उद्धव ठाकरेंना बसलेला मोठा धक्का होता. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. “उद्धव साहेबांची खुर्ची गेली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं?” असं अवधूत गुप्तेने राज ठाकरे यांना या कार्यक्रमात विचारलं. यावर राज ठाकरे म्हणाले, भाऊ म्हणून मला वाईट वाटलं आणि हा झाला एक भाग. पण मुख्यमंत्री म्हणून तुमचं लक्ष असायला हवं होतं. तुमचा सरळपणा, भाबडेपणा असेल किंवा तुमचं दुर्लक्ष असेल, पण या गोष्टीमुळे ४० जण तुमच्या हाताखालून निघून जातात हे काही सतर्क असलेल्या माणसाचं लक्षण नव्हे.”
‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता ‘झी मराठी’वर प्रसारित होणार असून याचे भाग तुम्ही ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.