‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घरोघरी पोहोचलेला अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप होय. पृथ्वीक प्रतापने आतापर्यंत अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केलंय. पृथ्वीक नावापुढे आडनाव लावत नाही, तो फक्त वडिलांचं नाव लावतो. यामागची कारणं नेमकी काय? त्याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला आहे.
पृथ्वीक प्रतापचं पूर्ण नाव पृथ्वीक प्रताप कांबळे आहे. ‘संपूर्ण स्वराज’ला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मी कांबळे आडनाव काढून टाकलं नाही, पण मी कांबळे आडनाव लावत नाही. त्याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे मी जवळपास वर्षभराचा असताना वडिलांना गमावलं. माझे वडील कसे दिसायचे तेही मला आठवत नाही. त्यामुळे आता मी काहीतरी चांगलं करतोय, तेव्हा माझे वडील कोण होते, हे लोकांना माहीत असावं ही माझी जबाबदारी आहे.”




हेही वाचा – “त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन
पुढे पृथ्वीक म्हणाला, “खरं तर इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना त्याबद्दलही कळतंच. पण दुर्दैवाने माझे बाबा कुठे पोहोचलेच नाही. ते त्यांच्या तिशीत गेले, त्यामुळे मी प्रतापचा मुलगा आहे हे लोकांना कळावं. कारण त्यांनी मला जन्माला घातलंय आणि त्यांचा मी ऋणी आहे. माझ्या कागदपत्रांवर माझं पूर्ण नाव आहे, पण जेव्हा क्रेडिट लिस्टमध्ये नाव येतं तिथे मी पृथ्वीक प्रताप लावतो. कारण लोक तेच नाव जास्त शोधतात.”
हेही वाचा – “मी मायलेकीला सोडलं नाही”; गौतमी पाटीलच्या वडिलांचा दावा; म्हणाले, “मी पुण्यात असताना…”
पृथ्वीकने आडनाव न लावण्याचं दुसरं कारणंही सांगितलं. तो म्हणाला, “भारत विकसनशील देश असल्याचं मी शाळेपासून ऐकत आलो आहे. आता १२-१५ वर्ष झाली तरी आपण विकसित झालेलो नाहीत. याचं कारण म्हणजे आपण आपले कोष सोडायला तयार नाहीत, असं मला वाटतं. आपण आपला बॉक्स तयार केलाय आणि प्रत्येकाला तेवढ्यातच जगायचं आहे. डॉक्टर, इंजिनीअर्सप्रमाणे आडनावावरून जात ओळखली जाते. हा कुलकर्णी आहे तर ब्राह्मण आहे, हा शिंदे ओबीसी, हा कांबळे आहे तर हा दलित, पाटील म्हणजे मराठा आहे. माझ्या मते, हा तुमचा माणूस असण्याचा पाया नाही.”
“आडनाव पाहून एका विशिष्ट चौकटीत तुम्हाला अडकवलं जातं. मला माझ्या जातीबद्दल अजिबात कमीपणा वाटत नाही. फरक इतकाच की आडनाव काढून टाकलं तर तुम्ही त्या व्यक्तीला माणूस म्हणून वागवता. आडनाव सांगितलं की लगेचच तुम्ही त्याची जात शोधायला लागता. लोकांना आडनावावरून जज केलं जातं. लोक आडनावात अडकून पडतात. भारतात आडनाव लावणं बंद झाल्यास तो विकसित देश होईल,” असा विश्वासही पृथ्वीक प्रतापने व्यक्त केला.
“आडनाव काढल्यास लोक समोरच्याला नावाने ओळखतील, जात विचारणार नाही. मला पृथ्वीक प्रताप कुठले असं खूपदा विचारतात, मी त्यांना राजस्थान सांगतो. कारण त्यांचा विचारण्याचा रोख तोच असतो. माझं आडनाव कांबळेऐवजी कांबळी, कुलकर्णी किंवा इतर काहीही असतं तरी मी लावलं नसतं,” असं स्पष्ट मत पृथ्वीक प्रतापने नोंदवलं.