Paaru Fame Actor: अभिनेते सुनील बर्वे हे त्यांच्या विविध भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांच्या चित्रपटांतील भूमिकांना जितके प्रेक्षकांचे प्रेम मिळते, तितकेच त्यांच्या मालिकांमधील भूमिकांचेदेखील कौतुक होते.

सध्या ते पारू या मालिकेत सयाजी या भूमिकेत दिसत आहेत. अहिल्याचा भाऊ आणि प्रियाचे वडील या भूमिकेतून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. सयाजी, असे त्यांच्या भूमिकेचे नाव आहे. सयाजी जरी प्रियाचे वडील असले तरी ते पारूलादेखील त्यांची मुलगी मानतात. तिच्यावर ते मुलीप्रमाणे प्रेम करतात, तिचे भले व्हावे यासाठी ते प्रयत्न करताना दिसतात.

जेव्हा त्यांना पारू व आदित्य यांचे एकमेकांवर प्रेम आहे, हे समजले, तेव्हा त्यांनी त्यांची साथ द्यायचे ठरवले. आदित्य आणि पारूला त्यांनी वेळोवेळी हे सत्य अहिल्याला सांगावे, असे सांगितले. पण, दिशाने मारुतीला किडनॅप केल्याने आदित्य व पारू अहिल्याला काहीही सांगू शकले नाहीत. पण, तरीही सयाजीने अहिल्याला याबद्दल सांगितले. तसेच, त्यांनी आदित्य व साजिरीच्या साखरपुड्यालादेखील विरोध केला. तसेच, जेव्हा आदित्य व साजिरीचा साखरपुडा होत होता, त्यावेळी त्यांनी आदित्यला सर्वांसमोर पारू व त्याच्या नात्याचे सत्य सांगण्यास सांगितले.

आता सुनील बर्वे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत मालिकेतील कलाकारांचे कौतुक केले आहे. त्यांनी मुग्धा कर्णिक, पूर्वा शिंदे, संजना काळे, शरयू सोनावणे, प्रसाद जवादे, अमृता देशमुख यांच्याबरोबर काही फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले, “या सगळ्या सुंदर कलाकारांसोबत मी पहिल्यांदा काम केलं. मला खूप आवडलं. त्यांचं मला माहीत नाही.” तसेच त्यांनी कलाकारांना टॅगदेखील केले.

आता त्यांच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अमृता देशमुखने लिहिले, “सर, तुमच्याबरोबर सज्जनगड सर करायला मजा आली. आता तुमच्याबरोबर अभिनयाचे गडसुद्धा सर करायचे आहेत.”

पुढे तिने लिहिले, “ज्या पद्धतीने तुम्ही मला तुमच्या सगळ्यांमध्ये सामील करून घेतले, ते मला खूप भावले. खरं सांगायचं तर, यश आणि नम्रता दोन्ही असलेली व्यक्ती मिळणे किती दुर्मीळ आहे हे मला जाणवलं. बरेच लोक यशस्वी होतात; पण फार कमी लोक चांगली माणसं असतात आणि हाच फरक आज मी तुमच्यात पाहिला.” अमृता देशमुख पारू या मालिकेत काम करीत नाही. मात्र, तिचा पती प्रसाद जवादे या मालिकेत प्रमुख भूमिकेत असल्याने ती अनेकदा त्याच्या सेटवर जात असते. तिने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सुनील बर्वे यांच्याबरोबर सज्जनगडला गेल्याचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते.

पारू या मालिकेत दामिनीच्या भूमिकेत काम करणारी श्रृतकीर्ती सावंतने लिहिले, “तुमच्याबरोबर काम करताना खूप काही शिकता आलं. धन्यवाद सर.” मालिकेत अहिल्याच्या भूमिकेत दिसणारी मुग्धा कर्णिकने लिहिले, “खूप वर्षांची माझी इच्छा पूर्ण झाली.”

कलाकारांबरोबरच चाहत्यांनीदेखील सुनील बर्वे यांचे कौतुक केले आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणेदेखील उत्सुकतेचे असणार आहे.