महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील एका लहानशा गावातील २७ वर्षीय हर्षल महादेव नक्षाणे ‘शार्क टँक इंडिया सीझन ३’ मध्ये झळकला. त्याने या शोमध्ये एआय कार्स सादर केल्या. हर्षलने वयाच्या १९व्या वर्षी या स्वप्नाला पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली, तसेच जागतिक ऑटोमोबाइल कंपनी निर्माण करण्याची स्वत:ची आवड तो जोपासत आहे.
एकेकाळी कार घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हर्षलने आर्टिफिशिअल इंटेलिजन्टद्वारे ऑटोमोबाईल उद्योगात क्रांती घडवून आणण्यासाठी आपल्या महत्त्वाकांक्षेला प्रकल्पाचे रूप दिले. २०१४ ते २०१९ या काळात इंधन सेलवर काम केल्यानंतर त्याने प्रोटोटाइप तयार करण्यासाठी ६० लाख रूपये आणि वैयक्तिक बचत केलेल्या रकमेची गुंतवणूक केली. ऑटोमोटिव्ह क्षेत्राचा कायापालट करण्याच्या उद्देशासह हर्षलने त्याच्या स्टार्टअपमधील ४ टक्के इक्विटी भागभांडवलाच्या बदल्यात २ कोटी रूपये गुंतवणुकीची मागणी केली. या शोमधील त्याच्या पिचने शार्क्सचे लक्ष वेधून घेतले तरी त्याला कोणतीच डिल मिळाली नाही.
शार्क टँकमधील अनुभवाबाबत सांगताना हर्षल म्हणाला, ”आमचा ब्रॅण्ड AiCars.in सह शार्क टँकमध्ये सहभाग तरूण उद्योजकांसाठी मोठी संधी आहे. शार्क्स महसूल निर्माण करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, तर जागतिक प्रभाव निर्माण करण्यासह क्रांतिकारी संकल्पना असलेल्या सीड-टप्प्यावरील उद्यमांमध्ये गुंतवणूक करत नाहीत. दुसरीकडे, राष्ट्रीय टेलिव्हिजनवर झळकल्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे सीड-टप्प्यावरील उद्योजकांना मदत करण्यास उत्सुक असलेल्या संभाव्य गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले जाते. अशा प्रतिष्ठित व्यासपीठावर आमचे तंत्रज्ञान दाखवण्याची संधी दिल्याबद्दल आभार.”
थोडक्यात, हर्षलचा प्रवास लहान शहरांमधील व्यक्तींना जागतिक व्यवसाय क्षेत्रात स्वत:ची छाप निर्माण करण्यास प्रेरित करतो आणि आव्हानं असताना देखील स्वत:चे नावलौकिक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याच्यासारख्या उद्योजकांना प्रोत्साहन देतो.