Yed Lagla Premacha Fame Vishal Nikam Shared A Post : अभिनेता विशाल निकम मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आजवर मालिका, चित्रपट अशा दोन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे. सध्या तो छोट्या पडद्यावरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य नायक म्हणून झळकत आहे. अशातच त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
विशाल तसा सोशल मीडियावरही सक्रिय असलेला पाहायला मिळतो. मालिकेच्या सेटवरील त्याचे व मालिकेतील सहकलाकारांबरोबरचे फोटो, रील तसेच बीटीएस व्हिडीओ तो यामार्फत शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. आता नुकतंच त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
विशालने शेअर केलेली पोस्ट यासाठी खास आहे, कारण यामधून त्याने त्याच्या मालिकेतील दोन ज्येष्ठ अभिनेत्रींबरोबरचे फोटो पोस्ट करत त्याला छान कॅप्शन दिल्याचं दिसतं. विशालने ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत जीजी व शशिकला या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नीना कुळकर्णी व अतिशा नाईक यांच्याबरोबरचे खास फोटो पोस्ट केले आहेत. विशालने या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमधून या लोकप्रिय अभिनेत्रींसह काम करण्याची संधी मिळाल्याने आभार मानत व्यक्त झाला आहे.
अभिनेत्याने या फोटोंना “जीजी, शशिकला काकी, राया. माझं प्रेरणास्थान, माझे गुरू. मी नशीबवान आहे की तुमच्यासारख्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करत आहे. खूप खूप धन्यावाद मॅम.” विशालने मालिकेच्या सेटवरील शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिघेही पारंपरिक लूकमध्ये दिसत आहेत.
विशाल ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत रायाची भूमिका साकारत आहे. यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिकेतून पाहायला मिळते. मालिकेतील त्यांची राया-मंजिरीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. गेल्या एका वर्षाहून अधिक काळ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
दरम्यान, विशालच्य कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने यापूर्वी ‘साता जन्माच्या गाठी’, ‘दक्खनचा राजा ज्योतिबा’, ‘आई मायेचं कवच’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. मालिकांव्यतिरिक्त त्याने ‘मिथुन’, ‘धुमस’, ‘बलोच’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. विशाल ‘बिग बॉस’ मराठीमध्येही झळकला होता, तर तो त्या पर्वाचा विजेता ठरला होता.