Yed Lagla Premacha fame Vishal Nikam shares a video: आपले आवडते अभिनेते, अभिनेत्री यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक अनेक गोष्टी करताना दिसतात. आता सोशल मीडियामुळे आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्याबद्दल जाणून घेणे चाहत्यांसाठी थोडे सोपे झाले आहे.
अनेक कलाकारही त्यांच्या व्यावसायिक, तसेच खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. चाहते कमेंट्स करीत त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसतात. आता अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याचा एक व्हिडीओ लक्ष वेधून घेताना दिसत आहे. प्रेक्षक या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत.
अभिनेता विशाल निकम हा टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘साता जन्माच्या गाठी’, ‘आई मायेचं कवच’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ अशा मालिकांमधून विशालने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच, ‘बलोच’, ‘मिथुन’, ‘धुमस’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ अशा चित्रपटांतदेखील त्याने काम केले आहे. त्याबरोबरच तो ‘बिग बॉस मराठी ३’ या रिअॅलिटी शोचा विजेतादेखील आहे. अभिनेत्याचा चाहतावर्ग मोठा आहे.
सध्या ‘विशाल येड लागलं प्रेमाचं’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत काम करताना दिसत आहे. आता मात्र तो त्याच्या अभिनयामुळे नाही, तर त्याने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे मोठ्या चर्चेत आला आहे.
विशालने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका कॅफेत असल्याचे दिसत आहे. तो काहीतरी बोलत आहे. तसेच हसतानादेखील दिसत आहे. त्याने गुलाबी रंगाचा शर्ट घातला असून, त्याचा हा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या समोरच्या टेबलावर बनवलेली एक कागदी नाव असल्याचेदेखील दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी तो कॉफी पिताना दिसतो. या व्हिडीओला त्याने सोनू निगमच्या आवाजातील तेरे बिन हे गाणे लावले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना, ‘तेरे बिन, तेरे संग, तेरे लिए’, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. “सौंदर्याच्या आधी मी कमेंट करतो”, “विशालने बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनपासून त्याची सौंदर्या कोण आहे, हे लपवून ठेवले आहे. कारण- आम्हाला वाटलं की, ती फॅमिली वीकमध्ये बिग बॉसमध्ये येईल;पण, ती आली नाही. आता जेव्हा विशाल लग्न करेल, तेव्हा त्याची सौंदर्या कोण आहे हे समजेल. हा सस्पेन्स तर ‘दृश्यम’ चित्रपटातील सस्पेन्सपेक्षा जास्त भयानक आहे”, “हँडसम”, “भाऊ, लय जोरात प्रेमात पडला आहे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.



काहींनी अक्षया हिंदळकरच्या सोशल मीडिया अकाउंटला टॅग करीत मृगसी, असे कमेंटमध्ये लिहीत त्यापुढे सौंदर्या असे लिहिले आहे. तर काहींनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. तर अभिनेत्री अक्षया हिंदळकरने खूप क्यूट दिसत आहेस, अशी कमेंट केली आहे.
विशाल निकम व अक्षया हिंदळकर ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेत एकत्र काम करताना दिसले होते. या मालिकेत विशाल निकमने युवराज तसेच अक्षयाने श्रुती ही भूमिका साकारली होती. अक्षया हिंदळकरला ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेतून मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती अबोली या मालिकेतदेखील दिसली. याबरोबरच, ‘पी. एस. आय. अर्जुन’ या चित्रपटातून अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
विशाल निकमच्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळताना दिसत आहे. राया आणि मंजिरी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसते. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.