‘ये जादू है जिन्न का’ फेम अभिनेत्री अदिती शर्मा आणि तिचा डिझायनर पती अभिनीत कौशिक घटस्फोट घेणार आहेत. त्यांच्या लग्नाला एक वर्षही झालेले नाही. दोघांच्या लग्नाला ९ महिने झाले आहेत, त्यापैकी सुरुवातीचे ४ महिने अदितीने तिचे लग्न लपवून ठेवले होते. अदिती व अभिनीत विभक्त होत असल्याची बातमी आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे.

अदितीचा पती अभिनीत याने घटस्फोटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तसेच कारणही सांगितले आहे. अदितीने लग्न केले, पण ते लपवून ठेवले. अवघ्या ४ महिन्यांनंतर तिने घटस्फोट मागण्यास सुरुवात केली. अभिनीतने आरोप केला की अदितीचे तिच्या सह-अभिनेत्याबरोबर विवाहबाह्य संबंध आहेत.

अदितीचे तिचा सह-अभिनेता सामर्थ्य गुप्ताबरोबर अफेअर आहे, असा आरोप अभिनीतने केला आहे. दोघांना रंगेहाथ पकडल्यानंतर अदितीने तिचं वैध नसल्याचं म्हटलं आहे. तिने अभिनीतकडून घटस्फोट मागितला आहे. इतकंच नाही तर तिने २५ लाख रुपयांची मागणीही केली आहे.

“आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि लिव्ह-इनमध्ये राहत होतो. तिच्या जवळच्या लोकांना, सहकलाकारांना आमच्याबद्दल माहीत होतं. मी तिचा मॅनेजर असल्याचं नाटक करत होतो. खरं तर मी तिचे काम, तिच्या मीटिंग्ज, तिचे इन्स्टाग्राम या सगळ्या गोष्टी सांभाळत होतो. आम्ही गेल्या वर्षी एकत्र राहू लागलो आणि नंतर नोव्हेंबरमध्ये लग्न केलं,” असं अभिनीतने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

“ती गेल्या दीड वर्षांपासून माझ्यावर लग्नासाठी दबाव आणत होती आणि मी तिला सांगायचो की मी लग्नासाठी तयार नाही. रिलेशनशिपच्या सुरुवातीला मी लग्नासाठी खूप उत्साही होतो, पण नंतर काही गोष्टींमुळे मी संभ्रमात होतो आणि लग्नासाठी तयार नव्हतो. पण तिने माझ्यावर दीड वर्ष लग्नासाठी दबाव टाकला, त्यानंतर मी होकार दिला. त्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये आमचे लग्न झाले. तिच्या करिअरमुळे कुणालाही लग्नाबद्दल कळू नये, अशी तिची अट होती,” असं अभिनीत म्हणाला.

“आम्ही तिच्या भावंडांच्या, माझ्या भावंडांच्या, आई-वडिलांच्या उपस्थितीत आमच्या घरी लग्न केलं. लग्नात दोन भटजी होते. लग्न पूर्णपणे विधीनुसार झाले. ३-४ दिवस सगळे कार्यक्रम झाले होते. माझ्याकडे आमच्या लग्नाचे किमान एक हजार फोटो आहेत,” असंही अभिनीतने सांगितलं.