अभिनेता प्रिन्स नरुलाची पत्नी व अभिनेत्री युविका चौधरी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. ती यूट्यूबवर व्लॉग बनवते आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी चाहत्यांना शेअर करते. अलीकडेच तिने सांगितले की, तिच्या मुलीची काळजी घेत असताना तिला दररोज कंटेंट शूट करणे थोडे कठीण होते. इतकेच नाही, तर ती तिचे व्लॉग व्हिडीओ स्वतः एडिट करते.

अशा परिस्थितीत तिला व्लॉग अपलोड करण्यासाठी वेळ लागतो. ती दर दुसऱ्या दिवशी व्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करते. आता अलीकडेच तिने एक व्लॉग शेअर केला आणि सांगितले की, तिच्या घरातील नोकराने तिच्या घरात चोरी केली. चला जाणून घेऊ अभिनेत्री काय म्हणाली त्याबाबत…

युविकाच्या घरात घरकामगाराकडून चोरी

युविका चौधरीच्या व्लॉगमध्ये प्रिन्सदेखील दिसला. अभिनेत्री म्हणाली, “आम्ही शांतपणे भेटतो आणि एकत्र वेळ घालवतो. मी म्हटल्याप्रमाणे, मी दररोज व्लॉग पोस्ट करणार नाही. मी दर दुसऱ्या दिवशी एक व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन; पण काही गोष्टी चालू आहेत, ज्या मी आता तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला सांगितले होते की, बरेच काही चालू आहे आणि मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगितली होती की फ्लाइटला उशीर झाला. त्यानंतरच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या नाहीत.”

युविका पुढे म्हणाली, “मी गोव्यात होते आणि प्रिन्स त्याच्या कामासाठी बाहेर होता, तेव्हा मला कळले की आमच्याकडे घरकामगाराने चोरी केली आणि तो पळून गेला. त्यावेळी घरात कोणीही नव्हते. त्यावेळी खूप काही चालले होते की, मी तुम्हाला काय सांगू. मग मी परत आल्यावर मी त्या गोष्टीची काळजी घेतली. घरात खूप पसारा झाला होता.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्रीने असेही सांगितले की, घरात खूप पसारा झाला होता. त्याच वेळी तिची मुलगी एकलिनदेखील आता खूप अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. अशा परिस्थितीत ती तिला एकटी सोडू शकत नाही म्हणून तिची आई घरून खाद्यपदार्थ व जेवण आणत आहे, कधी कधी ती तिच्या आईच्या घरी जात आहे. त्याबरोबरच अभिनेत्रीने असेही सांगितले की, ती घरकाम करणारी आणि आया शोधत आहे.