Unique Names of Chala Hava Yeu Dya’s 5 gangs: गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची मोठी चर्चा असल्याचे पाहायला मिळत आहे. २६ जुलैपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
एका नव्या रुपात, पहिल्या सीझनमधील काही जुन्या आणि काही नवीन चेहऱ्यांसह हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. पहिल्या सीझनची लोकप्रियता मोठी असल्याने आणि चला हवा येऊ द्या जवळजवळ १० वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवल्याने या शोचा चाहतावर्ग मोठा आहे.
‘चला हवा येऊ द्या’चा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
आता ‘चला हवा येऊ द्या‘चा एक प्रोमो झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव, भरत गणेशपुरे हे परीक्षकपदी बसलेले आहेत. महाराष्ट्रभरातून या शोसाठी ऑडिशन घेतल्याचे पाहायला मिळत आहेत. स्पर्धकांच्या एका वेगळ्या अंदाजामुळे ज्यांनी प्रेक्षकांना भरपूर हसवलं तेदेखील मनसोक्त हसताना दिसत आहेत.
या प्रोमोमध्ये ग्रँड ऑडिशनचा विशेष भाग दिसणार असल्याचे म्हटले आहे. तसेच कॉमेडीच्या डॉनची दमदार एन्ट्री होणार असल्याचेदेखील म्हटले आहे. यामध्ये कलाकारांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. तसेच कुशल व गौरव यांचे दमदार डायलॉगदेखील ऐकायला मिळत आहे. कुशल गौरवला म्हणतो की, तू ज्या जागेवर उभा आहेस, त्याचा जुना मालक मी आहे. हे कलाकार डान्सदेखील करताना दिसत आहेत.
पाच गँगची ‘ही’ आहेत भन्नाट नावे
आता श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव, भरत गणेशपुरे यांचे वेगवेगळे ग्रुप असणार असल्याचे दिसत आहे. त्यांच्या गँगला वेगवेगळी नावेदेखील आहेत. भरत गणेशपुरे यांच्या गँगचे नाव ‘लोटपोट रावडीज’ असे आहे. गौरव मोरेच्या गँगचे नाव ‘लाफ्टर्सचे बच्ची बंटाय’ असे आहे, तर श्रेया बुगडेच्या गँगचे नाव हे ‘गुदगुली गँगस्टर्स’ असे आहे.
प्रियदर्शन जाधवच्या गँगचे नाव ‘पंचेसचे मास्टरमाइंड्स’ असे आहे; तर कुशल बद्रिकेच्या गँगचे नाव ‘कॉमेडीचे शार्पशूटर्स’ असे आहे. या टीमची आपापसात स्पर्धा होणार असल्याचे दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने ग्रँड ऑडिशनमध्ये होणार गोळीबार हास्याचा, महाराष्ट्रात सुरू होतोय गँगवॉर कॉमेडीचा, अशी कॅप्शन दिली आहे. आता या पर्वात काय धमाल होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.