Kamali Upcoming Twist: सिद्धटेकहून मुंबईसारख्या मोठ्या शहरात शिक्षण घेण्याचे स्वप्न पू्र्ण करण्यासाठी कमळी काही दिवसांपूर्वी शहरात आली. मुंबईतल्या तिला पाहिजे असणाऱ्या कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला. मात्र, ही वाटचाल तिच्यासाठी सोपी नव्हती.

कधी अनिकाने तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर कधी अनिकाच्या आजीने तिला तिच्या स्वप्नांपासून दूर ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, कमळी जिद्दीने या सर्व संकटांना सामोरी गेली, प्रत्येक प्रसंगावर मात करीत अन् विजय मिळवीत ती पुढे जात राहिली. पण, या सगळ्यात ती एकटी नव्हती.

तिच्याबरोबर तिची बालमैत्रीण निंगी प्रत्येक क्षणी तिच्याबरोबर होती. तिचे कॉलेजमधील शिक्षक हृषी वेळोवेळी तिला मदत करीत होता. तर, कळत-नकळत अन्नपूर्णाआजीची साथ तिला लाभत होती.

‘लक्ष्मी निवास’ फेम विश्वा व कमळीची होणार भेट

आताही कमळीला त्रास देण्यासाठी अनिका अनेक गोष्टी करताना दिसत आहे. आता कमळी व निंगीला गणपतीची मूर्ती बनवता येऊ नये म्हणून अनिका त्यांना त्रास देणार आहे. यावेळी मात्र, कमळी व निंगीच्या मदतीला एक खास व्यक्ती येणार आहे.

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘कमळी’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, कमळी आणि निंगी यांच्या अगदी जवळ एक स्कूटर थांबते. कमळी त्या स्कूटरवरील मुलाला म्हणते की, गाडी कशी चालवायची ते कळत नाही का? तो मुलगा हेल्मेट काढतो. तर तो दुसरा-तिसरा कोणी नसून ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतील विश्वा असल्याचे पाहायला मिळते. विश्वा कमळी व निंगीला विचारतो की, काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर निंगी त्याला घडला प्रकार सांगते.

बाप्पााच्या मूर्तीची तयार झाली, असे म्हणून कमळी व निंगी खोलीबाहेर जातात. तितक्यात अनिका तिथे येऊन, त्यावर पाणी ओतते. कमळी आणि निंगी जेव्हा परत येतात, त्यावेळी त्यांना चिखल दिसतो. निंगी कमळीला म्हणते की, आता बाप्पा कसा तयार करायचा. हा प्रकार निंगी जेव्हा विश्वाला सांगते. तेव्हा विश्वा त्यांना म्हणतो की, मी तुम्हाला भेटलो ही बाप्पााचीच कृपा आहे. मी तुमची मदत करतो. हे ऐकल्यानंतर त्या दोघींना आनंद होतो.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘विश्वा कमळीसमोर जणू देवाचा माणूस बनूनच येणार’, अशी कॅप्शन दिली आहे. आता कमळी, विश्वा व निंगी एकत्र अनिकाचे कारस्थान कसे परतवून लावणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.