Lakhat Ek Aamcha Dada Upcoming Twist: अन्यायाविरुद्ध लढणारे, सत्याच्या बाजूने कायम उभे राहणारे, कुटुंबाला प्राधान्य देणारे, स्वत:च्या स्वप्नांसाठी धडपडणारे, प्रयत्न करणारे लोक सर्वांनाच आवडतात. त्यामुळे चित्रपट, मालिका, वेब सीरिज यांमधील अशी पात्रे प्रेक्षकांची लाडकी होतात.
‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतील सूर्यादादा ही भूमिकाही अशीच आहे, जो त्याच्या कुटुंबावर नि:स्वार्थीपणे प्रेम करतो, गावकऱ्यांच्या मदतीला धावून जातो. डॅडींना देवमाणूस मानणाऱ्या त्याला जेव्हा त्यांच्या दुष्कृत्याबद्दल समजते, तेव्हा तो त्यांना धडा शिकवायला मागे-पुढे बघत नाही.
तसेच, गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तो प्रयत्न करतो, कुटुंबासाठी हळवा होणारा तो वाईट लोकांबरोबर वाईट वागतो, अशा विविध छटा असलेली सूर्यादादा ही भूमिका प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसते.
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत ट्विस्ट
आता झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर लाखात एक आमचा दादा या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. त्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सूर्याच्या घरात गावकरी जमा झाले आहेत. सूर्या तिथे येतो आणि म्हणतो की काय झालं आहे? माझ्या आईनं काय केलंय? त्यावर जालिंदर ऊर्फ डॅडी म्हणतात की, तुझ्या आईनं दागिने चोरले आहेत.
डॅडींचे हे बोलणे ऐकूण सूर्याचा संताप होतो. तो मोठ्या आवाजात रागाने म्हणतो बास! माझ्या आईने दागिने चोरले नाहीत. खरा चोर तर हा आहे. हे म्हणताना तो डॅडींकडे बोट दाखवतो. त्यानंतर सूर्या एक व्हिडीओ गावकऱ्यांना दाखवतो, ज्यामध्ये डॅडी दागिने चोरताना दिसतात. सूर्या म्हणतो की, माझ्या आईची काही चूक नव्हती. या नीच माणसानं तिला फसवलं होतं. याला याच्या पापाची शिक्षा मी देणार.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सूर्या डॅडींना मारत आहे. तो म्हणतो, “तुझ्यामुळे माझी आई माझ्यापासून लांब गेली. तुझ्यामुळे तिच्या प्रेमाशिवाय, मायेशिवाय २१ वर्षे पोरकं होऊन आम्ही जगलो. तुझ्यामुळे माझ्या बहिणींना गावात टोमणे ऐकून घ्यावे लागले. तुझ्यामुळे माझा बाप दारू पिऊन स्वत:ला संपवत राहिला. का वागलास तू असं?”, हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘२० वर्षानंतर पुन्हा इतिहासीच पुनरावृत्ती’, अशी कॅप्शन दिली आहे.
डॅडींचे सत्य सूर्यासमोर आल्यानंतर त्याने उग्र रूप धारण केल्याचे पाहायला मिळत आहे. डॅडींच्या कारस्थानामुळे सूर्याची आई कित्येक वर्षे तुरुंगात होती. सूर्याची आई अचानक त्यांना सोडून कुठे गेली, का गेली याविषयी सूर्या व त्याच्या कुटुंबाला माहीत नव्हते. डॅडींनी तिच्याविषयी अफवा पसरवल्या होत्या. त्यानंतर सूर्याच्या कुटुंबाला गावकऱ्यांच्या अपमानाचा सामना करावा लागला होता. अशा कारणांमुळे सूर्या व त्याच्या बहिणींच्या मनात त्यांच्या आईबद्दल राग होता.
आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.