Mrunmayee Gondhalekar shares experience of Ganeshotsav: गणेशोत्सव म्हणजे सगळीकडे उत्साह, भक्ती, आणि चैतन्याने भरलेलं वातावरण असते. या सर्वजण एकत्र येत आनंदाने हा सण साजरा करतात. गणपती बाप्पााच्या स्वागतासाठी लोक जितके उत्सुक असतात आणि निरोप देताना भावुक होतात, हे दरवर्षी पाहायला मिळते.

मृण्मयी गोंधळेकर काय म्हणाली?

आता लाखात एक आमचा दादा मालिकेत काम करणारी अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकरने गणेशोत्सवाचा अनुभव सांगितला आहे. अभिनेत्री मालिकेत तुळजा या भूमिकेत दिसत आहे. मृण्मयीने नुकताच मराठी सिरिअल्स ऑफिशिअलशी संवाद साधला. ती म्हणाली, “यावर्षी मी गणपती बाप्पाची पूजा दोनदा केली. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते कि मला दोनदा गणपती बाप्पा अनुभवायला मिळाले.”

पुढे अभिनेत्री म्हणाली, “एक आमच्या मालिकेत म्हणजेच जगताप कुटुंबांनी बाप्पाच स्वागत केलं. गणेश आगमनाचा सीन आम्ही गणेशोत्सव सुरु व्हायच्या आधी शूट केला होता. गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत सर्व आम्ही मनापासून आणि उत्साहाने शूट केलं. फक्त गणपतीच नाही तर आमच्याकडे गौराईही बसल्या होत्या.”

“त्याआधी हरतालिकेची पूजा, इतर सर्व पूजा करायला मिळाल्या. या सणाची सुरूवात आधीच आमच्या सेटवर सुरु झाली होती आणि लाखात एक आमचा दादा मालिकेमुळे हे इतकं सगळं सुंदरपणे अनुभवायला मिळालं. मी माझ्या भूमिकेला ‘तुळजा’ला धन्यवाद म्हणेन कि तिच्यामुळे मला गणेशोत्सव दोनदा साजरा करायला मिळाला.

“माझ्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो आणि नेहमीप्रमाणे या वर्षीसुद्धा १५-२० आधी पासूनच तयारी सुरु केली होती. आम्ही इकोफ्रेंडली पद्धतींनी गणेशोत्सव साजरा करतो. अगदी साधी आणि सुंदर सजावट केले होते. बाप्पाच्या आवडीचे मोदक नेवेद्याला केले, गणपती अथर्वशीर्ष आवर्तन असत. त्यामुळे हे वर्ष माझ्यासाठी खूपच विशेष आणि भाग्याचं ठरलं.”

दरम्यान, मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. डॅडींचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. सूर्या डॅडींना त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.