Lakhat Ek Aamcha Dada New Twist: मालिकांमध्ये येणारी नवीन वळणे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवताना दिसतात. मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. आता लोकप्रिय मालिका ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतदेखील ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
तुळजाने दिली डॅडींना ताकीद
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सूर्या व तुळजा हे डॅडींच्या घरी आले आहेत. डॅडी व त्यांच्यात संवाद सुरू आहे. तुळजा व सूर्याला डॅडी म्हणातात, “आमच्या लक्ष्मी घरी परत आल्या.” त्यावर सूर्या म्हणतो, “त्या सगळ्या त्यांच्या इच्छेने परत आल्या आहेत, तुम्ही असं समजू नका की मी हे सगळं विसरून गेलो आहे. या घरात त्यांना परत त्रास होणार नाही याची आशा करतो.”
पुढे तुळजा डॅडींना म्हणते, “तुम्हाला तो देव मानत होता, पण लवकरच तो तुम्हाला राक्षस म्हणायलादेखील कमी कऱणार नाही. डॅडी आता तुमचा उलटा प्रवास सुरू झाला आहे.” तुळजाचे बोलणे ऐकूण डॅडींच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव पाहायला मिळत आहेत. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “तुळजा व सूर्या देणार जालिंदरला ताकीद”, अशी कॅप्शन दिली आहे.
‘लाखात एक आमचा दादा‘ मालिकेत दाखविल्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी तुळजाच्या वडिलांनी म्हणजेच डॅडींनी त्यांच्या पत्नीवर हात उचलला होता. हे पाहताच सूर्याचा संताप अनावर झाला. त्याने शालन व मालन यांना घरी आणले. तसेच डॅडींनी चूक केल्याचेदेखील त्याने म्हटले. याआधी सूर्याने कायमच डॅडींना देव मानले होते. ते म्हणतील ती गोष्ट सत्य म्हणून त्याप्रमाणे तो वागत होता.
डॅडींनी आतापर्यंत सूर्याच्या चांगुलपणाचा फायदा घेत त्याला फसवले आहे. अनेकदा तुळजाने त्याला हे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा जेव्हा तुळजाने डॅडींचा खरा चेहरा सूर्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्यात गैरसमज व भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, डॅडींच्या एका कृतीमुळे सूर्या त्यांच्यावर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे.
आता डॅडी सूर्याचे मन पुन्हा जिंकणार का, डॅडींचा खरा चेहरा सूर्यासमोर कधी येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.