Lakhat Ek Aamcha Dada upcoming promo: ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतील तुळजा ही उच्चशिक्षित आहे. तिने एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. मात्र, अचानक झालेल्या लग्नानंतर तिने तिच्या संसाराकडे अधिक लक्ष दिल्याचे पाहायला मिळाले.
सूर्या व तुळजाचे लग्न झाल्यानंतर तुळजाने तिच्या संपूर्ण घराला प्रेमाने सांभाळले. सूर्याची, त्याच्या बहिणींची, त्याच्या वडिलांची प्रेमाने काळजी घेतली. घरावर येणाऱ्या प्रत्येक संकटात ती सूर्याच्या बरोबरीने सामोरी गेली.
डॅडी सूर्याची फसवणूक करत असल्याचे समजल्यानंतर त्यांचे सत्य समोर आणण्यासाठीदेखील तिने प्रयत्न केले. या सगळ्यात तिचे करिअरकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळाले. आता तुळजाने तिचा दवाखाना सुरू करावा यासाठी सूर्या प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळाले.
पदवीदान समारंभात तुळजा आणि सूर्या होणार भावुक
झी मराठी वाहिनीने ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले की, तुळजाच्या कॉलेजमध्ये पदवीदान समारंभ सुरू आहे. तुळजाला पदवी देण्यात येणार आहे. तुळजाने लोकांच्या केलेल्या सेवेचाहीदेखील उल्लेख केला जातो. तिचे त्याबद्दल कौतुक होते. तिला गोल्ड मेडल मिळणार आहे यादरम्यानच सूर्याला या कार्यक्रमात येण्यापासून अडवले जाते. दुसरीकडे तुळजाचे शिक्षक सूर्याने तुळाजासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करतात. ते म्हणातात की, प्रत्येक यशस्वी पुरुषा पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. पण, मला या ठिकाणी असं सांगावं वाटते की प्रत्येक यशस्वी स्त्रीपाठीमागे एका विचारी पुरुषाचा हात असू शकतो.
पुढे तुळजा म्हणते की, मला जर मेडिकल लायसन्स घ्यायचं असेल तर मी ते माझ्या मिस्टरांच्या हातून घेईन. त्यावेळी सूर्यादेखील तिथे पोहोचतो. सूर्या व तुळजा दोघेही भावूक झाल्याचे पाहायला मिळतात.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने डिग्री घेताना तुळजा जपणार सूर्याचा स्वाभिमान अशी कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, मालिकेत तुळजाचे वडील म्हणजेच डॅडी सतत सूर्याविरुद्ध काहीतरी कारस्थान करताना दिसतात. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.