Lakhat Ek Aamcha Dada Upcoming Twist: ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. तुळजाच्या प्रयत्नाने सूर्याची आई घरी परतली आहे. मात्र, यामुळे सूर्या व त्याच्या कुटुंबाला गावकऱ्यांचा रोष ओढवून घ्यावा लागला.
जालिंदरची योजना यशस्वी होणार का?
काही वर्षांपूर्वी म्हणजे सूर्या व त्याच्या बहिणी लहान असताना त्याची आई अचानक एके दिवशी गावातून नाहीशी झाली. त्यानंतर असे सांगण्यात आले की ती गावातील देवीचे दागिने घेऊन देवळातील पुजाऱ्याबरोबर पळून गेली आहे. मात्र, सत्य परिस्थिती वेगळीच होती. जालिंदरमुळे सूर्याची आई म्हणजेच आशा इतके दिवस तुरुंगात होती. आता तिची सुटका झाली आहे.
त्यानंतरदेखील जालिंदरने तिला त्रास द्यायचा प्रयत्न केला. मात्र, आता तुळजामुळे ती तिच्या हक्काच्या घरी परतली आहे. मात्र, तरीही जालिंदर विविध पद्धतीने तिला त्रास देत असल्याचे दिसते. आता जालिंदरच्या कटामुळे आशाला एक खडतर व्रत करायला लागणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की गावकऱ्यांची बैठक भरली आहे. एक गावकरी म्हणतो, “आशाताईंना जर गावात राहायचं असेल तर त्यांना गडावरच्या देवीआईचं व्रत करावं लागेल.” ते ऐकल्यानंतर तुळजा म्हणते, गडावरच्या देवीआईचं व्रत करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्यावर जालिंदर म्हणतो की, आशाबाईंना त्यांचा खरेपणा सिद्ध करण्याची संधी आहे. आशा गावकऱ्यांच्या सगळ्या अटी मान्य करीत व्रत पूर्ण करण्याचा निर्धार बोलून दाखवते, त्यावर जालिंदर स्वत:शीच बोलताना म्हणतो की व्रत पूर्ण करताना मरणार.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, आशा व्रत करण्यासाठी गडाच्या पायथ्याशी गेली आहे. तिच्याबरोबर गावातील इतर मंडळी व तुळजादेखील आहे. आशाने हे व्रत गडाच्या पायऱ्यांवरून नाही तर आडवाटेने जाऊन पूर्ण करावे अशी अट ठेवली आहे. त्यावर तुळजा म्हणते, गडाच्या पायऱ्यांनी नाही तर त्या जाणार कशा? त्यावर एक गावकरी म्हणतो की पायऱ्या चढू द्यायच्या नाहीत, त्यांना वाट वर्ज्य करावी, अशी लेखी मागणी आली आहे.
त्यानंतर सूर्याची आई काट्यांतून अनवाणी पायाने गड चढताना दिसत आहे. सूर्या व तुळजा आईच्या मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळत आहे. ते आशाच्या वाटेतील झुडपे, काटे बाजूला करताना दिसत आहेत. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, सूर्याच्या साथीने आई देवी आईचं व्रत पूर्ण करू शकेल का? अशी कॅप्शन दिली आहे.
आता आशा हे व्रत पूर्ण करत तिचा खरेपणा सिद्ध करणार का, जालिंदरचा खोटेपणा सूर्यासमोर कधी येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.