‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादा व त्याच्या चार बहि‍णी या भावा-बहि‍णींच्या नात्यामधील प्रेम प्रेक्षकांना भुरळ घालते. स्वत:पेक्षा लहान बहि‍णींची मनापासून काळजी घेणारा, त्यांना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागू नये म्हणून सतत धडपड करणारा सूर्यादादा प्रेक्षकांना जवळचा वाटतो.

मालिकेत या बहीण-भावांच्या नात्याबरोबरच सूर्या व डॅडी यांचे नातेदेखील लक्ष वेधून घेते. डॅडी म्हणजे जालिंदर निंबाळकर हे गावातील प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक आहेत. जर गावात भांडणे झाली, इतर काही गोष्टी घडल्या, तर गावकरी डॅडींकडे त्यांच्या समस्या घेऊन येतात. डॅडी त्यांना आश्वस्त करतात, त्यावर उपाययोजना देतात. गावातील लोकांमध्ये डॅडींप्रति आदर आहे.

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत ट्विस्ट

डॅडी मात्र गावकऱ्यांसमोर त्यांची वेगळी प्रतिमा उभी करतात आणि खासगी आयुष्यात मात्र अमानुषपणे वागतात. ते लोकांची मदत करतात, असे दाखवतात. मात्र, खरे तर ते स्वत:चा फायदा करून घेतात. सूर्यासमोरदेखील त्यांनी स्वत:ची तशीच प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळे सूर्या त्यांना देवमाणूस मानतो. आता मात्र, सूर्यासमोर डॅडींचा खरा चेहरा समोर येणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर लाखात एक आमचा दादा या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, डॅडींची पत्नी म्हणते की, मालक तुम्ही हे सगळं थांबवू शकला असता. त्यावर डॅडी तिला म्हणतात की, जेवढी अवकात आहे, तेवढंच बोलायचं. बाई्च्या जातीनं घरातच जगायचं आणि घरातच मरायचं. त्यानंतर ते तिच्या कानाखाली मारतात. हे सर्व सूर्या पाहतो आणि त्याला धक्का बसतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सूर्या डॅडी, असे म्हणत मोठ्याने ओरडतो. तो हातात बेल्ट घेतो आणि म्हणतो की एका बाईवर हात उचलायची तुमची हिंमत कशी झाली? त्यानंतर तो डॅडींवर हात उचलताना दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘डॅडींचा मुखवटा सूर्यासमोर उघडा पडणार’, अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.