Lakhat Ek Aamcha Dada upcoming twist: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो; नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षावचित्रपट, मालिका यांच्याकडे प्रामुख्याने मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जाते. मात्र, अनेकदा यांमधून सामाजिक संदेश दिला जातो. समाजातील वाईट चालीरीती, समस्या यावर परखडपणे भाष्य करण्याची ताकद अशा माध्यमांमध्ये असते. काही मालिकादेखील अशा विषयांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात.
हुंडाबळी, मुलगी नको, अंंधश्रद्धा अशा अनेक समस्या आजही काही प्रमाणात समाजात असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. आता ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत मुलींचा जन्म नाकारणाऱ्यांना मालिकेतील नायक धडा शिकवताना दिसत आहे.
झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका लोकप्रिय आहे. याचे कारण म्हणजे सूर्या दादा आणि त्याच्या चार बहिणींचे एकमेकांवर असलेले अतोनात प्रेम, काळजी आणि एकमेकांसाठी काहीही करण्याची तयारी, यामुळे या भावंडांना प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळताना दिसते. सूर्या त्याच्या बहिणींच्या रक्षणासाठी काहीही करू शकतो. तसेच त्याच्या बहिणी सूर्याला त्रास होऊ नये, म्हणून काही गोष्टी सहन करताना दिसतात.
सूर्याची मोठी बहीण आणि डॅडींची सून तेजू गरोदर असतानाच डॅडींनी त्यांना नातू हवेत, असे स्पष्टपणे सांगितले होते. पण, तेजूला जुळ्या मुली होतात. दोन्ही मुली असल्याचे समजताच डॅडींचा संताप होतो. ते तेजू तसेच तिच्या बाळांना धोका पोहोचवत असल्याचे पाहायला मिळते. याचदरम्यान सूर्या आणि डॅडी यांच्यामध्यो जोरदार भांडण होते. सूर्या डॅडींच्या अंगावर धावून जातो.
जालिंदरला सूर्या शिकवणार धडा
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की सूर्या डॅडींच्या घरी आहे. तो एका पाटावर काहीतरी उगाळत आहे. तो डॅडींना म्हणतो की, तुम्ही तिथे एक गोष्ट ठेवली होती ना तीच उगाळून मी त्यामध्ये घातली आणि तीच मी तुम्हाला चाखायला देत आहे. हे ऐकल्यानंतर डॅडी म्हणजेच जालिंदर त्याच्या हातातली वाटी ढकलून देतो आणि मोठ्या आवाजात म्हणतो की आम्ही चाखणार नाही. सूर्याही संतापाने त्याचा आवाज वाढवतो, जालिंदरच्या कानाखाली देतो व म्हणतो की आवाज खाली. यादरम्यान, त्याने जालिंदरची कॉलर पकडलेली दिसत आहे.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की सूर्या घरात लावलेली एक तलवार आणतो आणि ती जालिंदरवर उगारत म्हणतो की मुली नकोत म्हणून तेजूच्या बाळांच्या जीवावर उठलात तुम्ही, काय चुकलेलं तिचं? मी तिला तुमच्या हाती सोपवलं हे माझं चुकलं. त्यानंतर तो ती तलवार मारताना दिसत आहे. सर्वांना वाटते की सूर्याने जालिंदरवर तलवारीने वार केला आहे. मात्र, त्याने ती तलवर सोफ्यावर टेकवलेली दिसते.
सूर्या पुढे म्हणतो की आता मी ते करणार आहे, जे जगातील प्रत्येक भावाने एका बहिणीसाठी केलं पाहिजे. तेजूचं लग्न लावून वाजत गाजत या घरात पाठवलं होतं. आजपण या घरातून नेताना तिला तसंच वाजत-गाजत मानाने घरी घेऊन जाणार आहे. यादरम्यान पाहायला मिळते की सूर्याने म्हटल्याप्रमाणे तेजूसाठी रथ, जालिंदरच्या घरापुढे वाजंत्री आणले आहेत. तेजूच्या लहान बाळांना आणि तेजूला तो रथात बसवतो आणि गावकऱ्यांच्या साथीने तिला तो आदराने, मान सन्मानाने घरी घेऊन जातो.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “वाजत गाजत मुलींचं स्वागत होणार, सूर्या दादा थेट जालिंदरला भिडणार?”, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात कमेंट करत सूर्याचे कौतुक केले आहे. “एक नंबर”, “वाह, मस्त”, “जिंकलास भावा”, “खरंच लाखात एकच असतो असा भाऊ”, “टायटल आणि मालिकेचा हा भाग एक नंबर”, “या मालिकेत जे खरं आहे, तेच दाखवतात, इतर मालिकांसारखं स्वप्न नसतं”, “दादा रॉक्स! समाजाला हे शिकवायला पाहिजे”, “सूर्या दादा या दोघांना कधी मारेल, याच गोष्टीची केव्हापासून वाट बघत होतो”, “एक नंबर दादा”, “असा भाऊ प्रत्येक बहिणीला पाहिजे”, “अंगावर काटा आला बघताना, एकच नंबर दाखवले”, “असाच भाऊ पाहिजे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे.







अभिनेत्री मेघा धाडेनेदेखील “वाह! जिंकलस भावा”, अशी कमेंट करत कौतुक केले आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे डॅडी ऊर्फ जालिंदर सूर्यासमोर चांगले असण्याचे, वागण्याचे नाटक करतो. मात्र, स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी, सूर्याची फसवणूक करतो. सूर्याला जालिंदरचा खरा स्वभाव माहीत नसल्याने तोदेखील त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, त्यांना देव मानतो. तुळजाने अनेकदा डॅडींच्या वाईट कृत्यांविषयी, ते त्याला फसवत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यामुळे सूर्या आणि तुळजा यांच्यामध्ये वाद झाले. अखेर, हळूहळू डॅडींचा चेहरा सूर्यासमोर येत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी तसेच मालिकेचा हा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.