Lakhat Ek Aamcha Dada will be re-released: ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बहीण-भावाच्या प्रेमावर आधारित ही मालिका मोठी लोकप्रिय ठरली. सूर्या दादा आणि चार बहिणींमधील प्रेमाने सर्वांची मने जिंकली. मालिकेत असे अनेक प्रसंग पाहायला मिळाले, जेव्हा प्रेक्षक म्हणाले की असाच भाऊ प्रत्येक बहिणीला मिळायला हवा.
लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका
जेव्हा सूर्याची सर्वात लहान बहिणी भाग्यश्रीला पहिल्यांदा मासिक पाळी येते आणि तेव्हा सूर्या घरात असतो. त्यावेळी ज्या पद्धतीने तो भाग्यश्रीला गोष्टी समजावतो. ती गोंधळलेली असते, तेव्हा तिला सांभाळतो. तो क्षण असो किंवा जेव्हा सूर्याची सर्वात मोठी बहीण तेजूला तिच्या सासरी त्रास दिल्यानंतर ज्या मान सन्मानाने तो तिला माहेरी घेऊन येतो, तो क्षण असो.
सूर्याच्या या वागण्याचे प्रेक्षकांनी कायमच कौतुक केले. त्याची पाठ थोपटली. सूर्या कायमच धनु व राजश्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्याच्या बहिणींना कोणत्याही संकटातून बाहेर काढण्यासाठी त्याने जीवाचे रान केले. डॅडींच्या कट कारस्थानामुळे त्यांची आई लहानपणीच त्यांच्यापासून दूर गेली. त्यानंतर गावाने त्यांच्यावर आरोप केले. त्यामुळे वडिलांना दारुचे व्यसन लागले. त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी सूर्याने स्वत:च्या खांद्यावर घेतली.
वडील व बहिणींचा त्याने प्रेमाने सांभाळ केला. त्याने मोठे केले. त्यामुळे त्याच्या चारही बहिणींच्या मनात त्यांच्या सूर्या दादाबाबत आदर आहे. प्रेम आणि माया आहे. याबरोबरच, सूर्याची आधीची मैत्रीण आणि त्याची पत्नी तुळजानेदेखील संपूर्ण घराला एकत्र बांधून ठेवले. सूर्याच्या बहिणींची आई होऊन त्यांच्यावर प्रेम केले. सूर्याच्या मित्रांनी म्हणजे काजू व पुड्याने त्याला वेळोवेळी साथ दिली. शत्रू व डॅडींचा कारस्थानाचा सामना करताना सूर्याला त्याच्या कुटुंबाने कायमच साथ दिली.
‘लाखात एक आमचा दादा’ मालिका पुन्हा कुठे पाहता येणार?
आता मालिका संपताना प्रेक्षकांसह कलाकारदेखील भावुक झाल्याचे दिसत आहेत. मालिका संपत असली तरी ज्यांना ही मालिका पुन्हा पाहायची आहे. ते ही मालिका पुन्हा एकदा पाहू शकतात. कधी व कुठे? जाणून घेऊयात…
झी मराठी या वाहिनीवरुन ही मालिका निरोप घेत असली, तरी ही मालिका प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. झी चित्रमंदीर या चॅनेलवर ही मालिका प्रदर्शित होणार आहे. ६ ऑक्टोबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दररोज संध्याकाळी ७ वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे.