Lakshami Niwas Upcoming Twist: ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत एकापेक्षा एक पात्रे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. त्यातील काही सकारात्मक, तर काही नकारात्मक आहेत. तर काही पात्रे ही काही वेळी चांगली तर काही वेळा वाईट वागताना दिसतात.
झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘लक्ष्मी निवास‘ ही मालिका नवनवीन गोष्टींमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असते. काही दिवसांपूर्वीच व्येंकीचे अचानक लग्न झाल्याचे पाहायला मिळाले; तर सिद्धूने गुपचूप भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. हरीश व सिंचना यांच्यामध्ये सध्या दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. तर, लक्ष्मी व श्रीनिवास त्यांचा हा संसाराचा गाडा व्यवस्थित चालावा, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
श्रीनिवासने त्याची नोकरी गमावल्यानंतर तो रिक्षा चालवीत असल्याचे पाहायला मिळत असून, लक्ष्मी खानावळीत काम करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. भावना आनंदीसाठी सुपर्णा व तिच्या नवऱ्याशी झगडताना दिसत आहे; तर जयंत व जान्हवीचे नातेदेखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.
जयंतचे जान्हवीवर प्रचंड प्रेम आहे. ते इतके आहे की, त्याला तिने इतर कोणाहीबरोबर बोलल्याचे आवडत नाही. तसेच, तिने घराबाहेर जाऊ नये आणि इतर कोणासाठीही कोणतीही गोष्ट करू नये, असे त्याला वाटते. जान्हवीने फक्त त्याच्यावर प्रेम करावे, त्याच्याशी बोलावे, त्याच्यासाठी गोष्टी कराव्यात, अशी जयंतची इच्छा असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते. त्याबरोबरच जयंतला प्रमाणापेक्षा जास्त स्वच्छता आवडते. कोणत्याही प्रकारचा डाग, अस्ताव्यस्तपणा त्याला आवडत नाही. जर असे झालेच, तर त्याचा संताप अनावर होतो.
जान्हवीकडून ‘ती’ चूक होणार
जयंतने याआधीदेखील जान्हवीला अनेक शिक्षा दिल्या आहेत. त्यामध्ये झुरळ घातलेले दूध प्यायला देण्यापासून ते तिला कपाटात कोंडून ठेवण्यापर्यंत अशा अनेक शिक्षा त्याने तिला भोगायला लावल्याचे पाहायला मिळाले आहे. आता मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्यामध्ये जयंत जान्हवीला पुन्हा शिक्षा देणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.
झी मराठी वाहिनीने लक्ष्मी निवास मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, जयंत जान्हवीला चहा आणून देतो. तो तिला म्हणतो की, चहा घे आणखी फ्रेश होशील. जान्हवी चहा पिताना तो चहा खाली सांडतो. त्यावर जान्हवी त्याला सॉरी म्हणते. तसेच ती घाबरल्याचे दिसते.
जयंत जान्हवीला म्हणतो की, तुला शिक्षा मिळायलाच हवी. त्यानंतर तो जान्हवीजवळ उशी घेऊन जातो. ते पाहून तो काहीतरी इजा पोहोचवणार, असे वाटून जान्हवी घाबरते. पण, त्यानंतर जयंत जान्हवीला म्हणतो की, तुला पिलो फाईट खेळावी लागेल. त्यानंतर जान्हवीच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे. पुढे जयंत व जान्हवी यांच्यातील गोड क्षण पाहायला मिळत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने “जान्हवीला जयंत देणार प्रेमाची शिक्षा”, अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.