सध्या ‘लक्ष्मी निवास’ या मालितकेत श्रीनिवास या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असलेले अभिनेते म्हणजे तुषार दळवी. श्रीनिवास हा कुटुंबाला जोडून ठेवणारा, जितका प्रेमळ तितकाच कडक शिस्तीचा, पत्नीला वेळोवेळी साथ देणारा असा हा श्रीनिवास प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसते.

तुषार दळवी काय म्हणाले?

लक्ष्मी निवास‘ मालिकेत श्रीनिवास ही भूमिका अभिनेते तुषार दळवींनी साकारली आहे. नुकतीच त्यांनी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तुषार दळवी म्हणाले, “सह्याद्री वाहिनीवर बऱ्याच वर्षांपूर्वी ‘राऊ’ नावाची मालिका आली होती. बाजीराव पेशव्यांवर आधारित ती मालिका होती. अस्मिता चित्रचं बॅनर होतं. स्मिता तळवलकर या त्या मालिकेच्या निर्मात्या होत्या. त्या मालिकेत मी राऊ ही भूमिका साकारली होती. अश्विनी भावे या मस्तानी होत्या. काशीबाईच्या भूमिकेत स्मिता मॅडम होत्या.”

“पूर्वी असं असायचं की, तुम्हाला एखादा किंवा चार एपिसोड चॅनेलला दाखवायला लागायचे. चॅनेल मग काही बदल असतील तर सांगायचं. त्यानंतर मालिकेसाठी स्लॉट मिळायचा. तारीख मिळायची. त्यानंतर नियमित शूटिंग सुरू व्हायचं. या सगळ्यात थोडा वेळ गेला. याचदरम्यान मला महेशजींकडून ‘जीवलगा’साठी विचारणा झाली. त्या दोन्हीच्या तारखा अगदीच वेगळ्या होत्या, त्यामुळे काही प्रश्न नव्हता.”

“माझं आणि संजय सुरकर यांचं बोलणंही झालं होतं, पण तारखा पुढे मागे झाल्या. त्यामुळे राऊची जी टेलिकास्टची तारीख होती, ती अगोदर आली. त्यामुळे आता काय करायचं, असा प्रश्नच निर्माण झाला होता. मला जीवलगा आणि राऊ या दोन्हीतील भूमिका साकारायच्या होत्या, कारण दोन्ही नायकाच्या भूमिका होत्या. तारखा अॅडजेस्ट कसं करायचं हे त्यावेळी मला माहीत नव्हतं, कोणी सांगणारं नव्हतं. त्यावेळी मग मी त्यांना म्हणालो की तुम्हीच ठरवा, कारण मला दोन्ही भूमिका करायच्या आहेत. अर्थात थोडी भांडणे झाली, गैरसमज झाले. राऊची भूमिका माझ्या हातून गेली. दुसऱ्या अभिनेत्याने ती भूमिका साकरली. मला खूपच वाईट वाटलं होतं. खूप पब्लिसिटी झाली होती. त्याचे चार एपिसोड शूट केले होते. पण, जेव्हा ते टेलिकास्ट झालं तेव्हा त्यामध्ये मी नव्हतो.

पुढे तुषार दळवी म्हणाले, त्या वयात खूप वाईट वाटलं होतं. खूप रडलो. पण, म्हणतात की वर्तुळ पूर्ण होत असतं. काही वर्षांनी अल्फा मराठी सुरू झालं होतं. त्यांनी पेशवाई नावाची मालिका केली. त्यामध्ये सगळ्या पेशव्यांवर ती मालिका केली होती. त्या मालिकेच्या निर्मात्या स्मिता तळवलकर, दिग्दर्शक संजय सुरकर होते. त्यादरम्यान मी हिंदी मालिका करायला लागलो होतो. तोपर्यंत आमचे समज-गैरसमज, भांडणं मिटली होती. दोघांनाही कळलं होतं की चूक तशी कोणाचीच नव्हती. त्या म्हणाल्या की मला त्यावेळी थांबणं शक्य नव्हतं. पण, ८-९ वर्षांनी तीच निर्माती, तोच दिग्दर्शक आणि तीच भूमिका परत माझ्या वाट्याला आली. पेशवाईमध्ये बाजीराव ही भूमिका साकारली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तुषार दळवींनी अनेक मराठी हिंदी मालिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.