Lakshmi Niwas Upcoming Twist: ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील जयंत व जान्हवी यांचे नाते सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते. जयंतच्या संशयी व अतिशोयोक्ती करण्याच्या स्वभावामुळे तो अनेकदा विकृत पद्धतीने वागताना दिसतो.

जयंत व जान्हवी यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. जान्हवी जयंतसाठी निस्वार्थी भावनेने अनेक गोष्टी करताना दिसते. जयंतचेदेखील जान्हवीवर खूप प्रेम आहे, पण तो संशयी वृत्तीचा आहे. तसेच त्याचा स्वभाव विकृत असल्याचेदेखील दिसते. जान्हवीने फक्त त्याच्यावरच प्रेम करावे, फक्त त्याच्याशीच बोलावे, त्याच्या व्यक्तिरिक्त तिने कोणालाच महत्त्व देऊ नये, इतर कोणासाठी कोणती गोष्ट करू नये, बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवू नये असे जयंतला वाटते.

जान्हवीने जर त्याचे हे नियम मोडून काही करण्याचा प्रयत्न केलाच तर तो विकृतपणे वागतो. जान्हवीला किंवा तिने ज्या व्यक्तींबरोबर संवाद साधला आहे, त्यांना तो शिक्षा देताना दिसतो. जान्हवीवर लक्ष ठेवण्यासाठी घरातदेखील सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी जान्हवीने जयंतसाठी खीर बनवली होती. ती कशी झाली आहे हे विचारण्यासाठी ती खीर तिने चौकीदाराला दिली होती. त्यानंतर जान्हवीने चौकीदाराला साबुदाणा वडादेखील दिला होता. जेव्हा हे जयंतला समजले तेव्हा त्याला खूप राग आला. त्याने त्या चौकीदाराला शिक्षा दिली. त्याच्यावर त्याने हल्ला केल्याचे पाहायला मिळाले.

जयंत ‘ती’ चूक करणार आणि त्याचे सत्य जान्हवीसमोर येणार

आता झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, जयंत-जान्हवीच्या घरी पोलिस आले आहेत. ते पाहून जयंत त्यांना विचारतो की काय झालं? त्यावेळी त्या चौकीदाराची पत्नी तिथे येते. ती म्हणते की, माझा धनी इथं वॉचमनचं काम करतो. तुम्ही त्याला कुठे लपवून ठेवले आहे? माझ्या नवरा कुठेय? बोला. त्याचदरम्यान जयंतला त्याने त्या वॉचमनला कसे मारले होते हे आठवते. त्या महिलेचे बोलणे ऐकून पोलिस म्हणतात, यांच्या घरच्या सीसीटीव्हीमध्ये ते रेकॉर्ड झालं असेल. बाहेरच्या सीसीटीव्हीचे फुटेज चेक करूयात. पण, घरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करणं तितकंच गरजेचं आहे.

घराच्या आतील सीसीटीव्हीचा उल्लेख ऐकताच जान्हवीला धक्का बसतो. ती जयंतला त्याबद्दल विचारते. जयंत तिला मी तुला सगळं नीट सांगतो, असे म्हणत आश्वस्त करण्याचा प्रयत्न करतो. पण, जान्हवी त्याचा हात झिडकारते. तिच्या डोळ्यात त्याच्याविषयी अविश्वास दिसतो. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “जयंतच्या लपवलेल्या सत्यांचा उलगडा जान्हवीसमोर होणार”, अशी कॅप्शन दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता जयंतचे सत्य जान्हवीसमोर आल्यानंतर ती काय करणार, निर्णायक पाऊल उचलणार की नेहमीप्रमाणे जयंतला माफ करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.