Paaru Upcoming Twist: ‘पारू’ या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात. या मालिकेतील आदित्य, पारू, दामिनी, दिशा, अहिल्यादेवी किर्लोस्कर, प्रीतम, प्रिया, मारूती, गणी, श्रीकांत, परितोष अशी सर्वच पात्र त्यांच्या विविधतेमुळे लक्ष वेधून घेतात.
दिशाने श्रीमंत किर्लोस्करांची सून होण्याचे स्वप्न पाहिले होते, त्यासाठी तिने प्रीतमबरोबर खोटे प्रेमाचे नाटक केले. अहिल्यादेवीला गोड बोलून तिने फसवले. मात्र, प्रीतम प्रियाच्या प्रेमात पडला. आदित्य व पारूला दिशाचे सत्य समजले, त्यामुळे आदित्य व पारूने प्रियाच्या वडिलांना प्रीतमबरोबर लग्न करण्यासाठी होकार द्यावा, यासाठी प्रियाच्या घरी ते प्रीतमसह नोकर म्हणून राहिले. तिच्या वडिलांचे मन जिंकले. तसेच, दिशाचा खरा चेहरा अहिल्यादेवीसमोर आणला आणि लग्न मोडले. प्रिया व प्रीतम यांचे लग्न झाले, त्यामुळे दिशाचे किर्लोस्करांची सून होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
त्यानंतरदेखील तिने किर्लोस्करांना त्रास देण्यासाठी कट कारस्थाने केली. त्यात तिच्या बहिणीला अनुष्काला जीव गमवावा लागला. आता तिने दामिनीच्या भाच्याशी म्हणजेच परितोषशी लग्न केले आहे, त्यामुळे तिला किर्लोस्करांच्या घरात राहण्याची संधी मिळत आहे. ती आता बदलली असल्याचे तिने घरातील सदस्यांना सांगितले आहे. मात्र, किर्लोस्करांना त्रास देण्यासाठी तिने परितोषचा वापर केल्याचे पाहायला मिळते.
आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिशा पारूच्या वडिलांचा म्हणजेच मारूतीचा छळ करताना दिसत आहे. मारूती हा किर्लोस्करांच्या घरात वर्षानुवर्षे ड्रायव्हर म्हणून काम करतो. तो स्वामीनिष्ठ आहे, त्यामुळे किर्लोस्करांवर कुठलेही संकट येऊ नये म्हणून तो सतत प्रयत्न करत असतो. त्यामुळे जेव्हा त्याला पारू व आदित्य एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे समजले, तेव्हा त्याने पारूला मारण्याचा प्रयत्न केला होता.
दिशा मारुतीचा छळ करणार
आता झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये दिशा मारूतीला कान धरून उठाबशा काढायला सांगत असल्याचे पाहायला मिळत आहे. दिशा मारूतीला म्हणते, “कान धर आणि शाळेतील मुलं ज्या प्रमाणे उठाबशा काढतात, तशा उठाबशा काढ.” पुढे ती मारूतीला सांगते, “खाली बस आणि हे काळं तुझ्या चेहऱ्यावर फासून घे,” त्यावेळी मारूतीच्या डोळ्यात अश्रू आल्याचे दिसते.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की पारू तिच्या वडिलांना आवाज देत घरात येते, पण मारूती तिच्या हाकेला उत्तर देत नाही. त्यानंतर पारू स्वत:शीच बोलते. ती म्हणते की, दिशा मॅडमनी बाच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर? असे म्हणताना ती भावूक झाल्याचे दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना दिशाचं हे वागणं पारूला कळणार का? अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.