Aamhi Sare Khavayye Zee Marathi Show : ‘झी मराठी’ वाहिनीवर काही दिवसांपूर्वीच ‘चला हवा येऊ द्या’ हा शो जवळपास दीड वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा सुरू करण्यात आला. आता या पाठोपाठ वाहिनीवर आणखी एक जुना रिअ‍ॅलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचं नाव आहे ‘आम्ही सारे खवय्ये’.

‘आम्ही सारे खवय्ये’ हा कार्यक्रम वाहिनीवर दुपारच्या सत्रात प्रसारित केला जायचा. घराघरांतील गृहिणी मोठ्या आवडीने हा कार्यक्रम पाहायच्या. प्रशांत दामले, राणी गुणाजी, संकर्षण कऱ्हाडे या कलाकारांनी हा कार्यक्रम होस्ट केला होता. २००७ पासून वाहिनीवर या कार्यक्रमाची सुरूवात झाली होती. यानंतर एप्रिल २०२३ मध्ये या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता जवळपास दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ‘आम्ही सारे खवय्ये’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होणार आहे.

मात्र, यंदाची थीम खूपच हटके असेल. लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा शो होस्ट करणार आहे. तर, यंदाची थीम असेल जोडीचा मामला. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोड्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. “आता जोडीने वाढणार खमंग जेवणाची गोडी, सोबतीला असेल धमाल आणि कमाल लव्हस्टोरी!” असं कॅप्शन देत वाहिनीने हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांच्या भन्नाट लव्हस्टोरी सुद्धा प्रेक्षकांना ऐकायला मिळतील असं कॅप्शनवरून स्पष्ट होत आहे.

‘आम्ही सारे खवय्ये’ या शोच्या नव्या प्रोमोमध्ये संकर्षण कऱ्हाडेसह प्रेक्षकांना मृण्मयी देशपांडे-स्वप्नील राव, अभिजीत खांडकेकर- सुखदा खांडकेकर, हेमंत ढोमे – क्षिती जोग या जोडप्यांची झलक पाहायला मिळत आहे. आता या जोड्या आपल्या चाहत्यांना कोणकोणते चमचमीत पदार्थ बनवून दाखवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

‘आम्ही सारे खवय्ये’ ‘या’ दिवशी सुरू होणार

‘आम्ही सारे खवय्ये’ या शोचा नवीन सीझन येत्या ९ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फक्त शनिवारी आणि रविवार दुपारी १ वाजता हा कार्यक्रम ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केला जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘झी मराठी’ वाहिनीवर ऑगस्टमध्ये एकूण तीन शो सुरू होणार आहेत. यामध्ये ११ ऑगस्टला सुरू होणाऱ्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि ‘तारिणी’ या मालिकांचा समावेश आहे. तर, ‘आम्ही सारे खवय्ये’ हा शो देखील ९ ऑगस्टपासून भेटीला येत आहे.