Savalyachi Janu Savali fame Prapti Redkar: मालिकेत दिसणारे कलाकार हे अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येतात. कधी विनोदी रील्स, कधी डान्स तर कधी मनातल्या भावना व्यक्त करत हे कलाकार चाहत्यांच्या संपर्कात राहतात.

विशेष म्हणजे कलाकारांचे अभिनयाव्यतिरिक्तच्या कला पाहायला मिळतात. काहीजण उत्तम गाणी गातात, काहीजण पेटिंग करतात, तर काहीजण डान्स करत प्रेक्षकांची मने जिंकतात. त्यामुळे मालिकेतील भूमिकांना जितके चाहत्यांचे प्रेम मिळते, तितकेच त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडीओंनादेखील प्रेक्षकांचे प्रेम मिळते.

आता सावळ्याची जणू सावली मालिकेतील प्राप्ती रेडकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा तिचा डान्सचा व्हिडीओ आहे. हृतिक रोशनच्या वॉर २ या चित्रपटातील ‘आवां जावां’ या गाण्यावर तिने डान्स केला आहे. तिच्या डान्स स्टेप्स लक्ष वेधून घेत आहेत.

हा व्हिडीओ शेअर करताना तिने हे गाणे तिला आवडले असल्याचे कॅप्शन लिहिले आहे. तसेच, तिची सहकलाकार भाग्यश्रीने तिला हा डान्स शिकवला यासाठी तिचे आभार मानले आहेत.

नेटकरी म्हणाले…

प्राप्तीच्या या व्हिडीओवर तिची मालिकेतील सहकलाकार भाग्यश्रीने कौतुक केले आहे. तसेच, अनेक नेटकऱ्यांनीदेखील तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “वाह!मस्त”, “खूप सुंदर”, “खूप छान”, “सुपर लूक, सुपर डान्स”, “खूप छान डान्स”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

प्राप्ती रेडकर सध्या झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. सावली असे तिच्या भूमिकेचे नाव आहे. सर्वांची काळजी घेणारी, कमी बोलणारी पण हुशार असणारी, संकटात मार्ग काढत पुढे जाणारी, परिस्थितीमुळे भैरवीच्या अटी मान्य करणारी पण आई वडिलांचा आत्मसन्मान जपणारी, सासरच्यांनी कितीही राग केला तरीही प्रेमाने त्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करणारी, सारंगवर मनापासून प्रेम करणारी अशी सावली आहे. सावली व सारंग यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

दरम्यान, मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळते, त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार ही प्रेक्षकांची उत्सुकता कायम असते.