Savalyachi Janu Savali upcoming twist: ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेचे कथानक आणि कलाकारांचा सहज अभिनय यांमुळे प्रेक्षक मालिकेला दाद देताना दिसत आहेत. वेळोवेळी ते कलाकारांचे कौतुक करताना दिसत आहेत.
‘सावळ्याची जणू सावली‘ ही मालिका सावली या मुलीभोवती गुंफलेली आहे. एका गरीब कुटुंबातील, विठ्ठलाची भक्ती करणाऱ्या आई-वडिलांची मुलगी, साध्या-सरळ आणि प्रेमळ भावांची बहीण असलेली ही सावली तिच्या गोड स्वभावाने सर्वांची मने जिंकते. गोड आवाजाची तिला दैवी देणगी आहे. मात्र, याचाच गैरफायदा गायिका भैरवी वझे घेते. भैरवीकडे अमाप संपत्ती, प्रतिष्ठा आहे; पण तिची मुलगी गाणे म्हणू शकत नाही. गायनाचा वारसा मुलीने पुढे चालवावा, अशी भैरवीची तीव्र इच्छा होती. पण ताराला गाता येत नसल्याने तिने युक्ती शोधली.
भैरवी होणार भावुक
भैरवीने सावलीचा आवाज ऐकला. तिला गाण्याचे प्रशिक्षण देण्याचे कबूल केले. पण, त्या बदल्यात सावलीचा आवाज तिच्याकडे गहाण राहील. ती तारासाठी कायम गाणे हात राहील. आणि भैरवी सावलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करेल, असे ठरले होते. त्यामुळे आतापर्यंत सावली छान गाणे म्हणू शकते हे कोणालाही माहीत नाही. याउलट, तारा लोकप्रिय गायिका म्हणून प्रसिद्ध आहे.
आता समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये सावली भैरवीला गुरुदक्षिणा देणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. झी मराठीने सावळ्याची जणू सावली या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सावली भैरवीच्या घरी जाते. तिला माई म्हणून हाक मारते. त्यावर भैरवी कठोरपणे तिला विचारते, का आली आहेस? त्यावर सावली म्हणते की, तुमचा आशीर्वाद घ्यायला आली आहे. त्यानंतर सावली भैरवीचा आशीर्वाद घेत, तिचे औक्षण करते.
याचदरम्यान, भूतकाळातील काही क्षण भैरवीच्या डोळ्यासमोर येतात. जेव्हा तिने सावलीला खडसावून सांगितलेले असते की, माझ्या परवानगीशिवाय तू कुठेही कोणासमोर गायचे नाही. त्यानंतर भैरवी भावूक झाल्याचे दिसले. ती म्हणते, “सावली तुझी ही गुरुदक्षिणा आवडली. तुझा खोटेपणा लपणार नाही.” त्यानंतर सावलीच्या डोळ्यांतदेखील पाणी दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी सावलीला मिळेल का भैरवीचा आशीर्वाद?”, अशी कॅप्शन दिली आहे. सध्या सारंग व सावली यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसत आहे. मात्र, तारा, ऐश्वर्या सावलीला त्रास देण्यासाठी सतत कारस्थान करत असल्याचे दिसते. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.