Savalyachi Janu Savali upcoming twist: झी मराठी वाहिनीवर लवकरच ‘आम्ही सारे खवय्ये’ हा कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे हा शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करणार आहे. तत्पूर्वी संकर्षणने सावळ्याची जणू सावली या मालिकेत हजेरी लावली आहे.
‘सावळ्याची जणू सावली’मध्ये रंगणार ‘आम्ही सारे खवय्ये’चा कार्यक्रम
झी मराठीने सावळ्याची जणू सावली मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये पहायला मिळते की संकर्षण मेहेंदळेच्या घरी येतो. सारंग त्याचे प्रेमाने स्वागत करतो. याबरोबरच तिथे सर्व कुटुंबिय एकत्र असल्याचे पाहायला मिळते.
संकर्षण सर्वांना म्हणतो की तिलोत्तमा मावशीच्या चारही सुना आम्ही सारे खवय्येची रंगीत तालीम करणार आहेत. त्यानंतर सावली, तारा, ऐश्वर्या, अमृता विविध पदार्थ बनवताना दिसतात. यामध्ये त्यांना त्यांचे पती मदत करताना दिसत आहेत. यादरम्यान, ‘आम्ही सारे खवय्ये’चे शीर्षक गीत ऐकायला मिळते.
संकर्षण म्हणतो, जगातील सर्वात अवघड जॉब कुठला असेल तर तो गृहिणीचा आहे. पुढे तो असेही म्हणतो की तुझी सावली अन्नपूर्णा आहे. संकर्षणकडून हे वाक्य ऐकल्यानंतर सावली व सारंग यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
झी मराठी ने हा प्रोमो शेअर करताना आम्ही सारे खवय्ये अशी कॅप्शन दिली आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर मालिकेचा हा एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता दिसत आहे.
सावळ्याची जणू सावली या मालिकेबद्दल बोलायचे तर मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. सारंगचा भाऊ राजकुमार दुसऱ्या एका मुलीला गुपचूप भेटत असल्याचे सावलीने पाहिले. याबाबत तिने घरच्यांना सांगितले. पण तिच्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. आता मालिकेत पुढे काय होणार, राजकुमार चे सत्य सर्वसमोर कधी येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संकर्षणच्या कामाबद्दल बोलायचे तर अभिनयाबरोबरच, सूत्रसंचालनासाठीदेखील संकर्षण ओळखला जातो. याबरोबरच, त्याने ड्रामा ज्युनिअर्स या कार्यक्रमात परिक्षकाची जबाबदारीदेखील सांभाळली आहे. संकर्षण त्याच्या कवितांसाठीदेखील ओळखला जातो. त्याच्या नाटकांनादेखील प्रेक्षकांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसते. आता आम्ही सारे खवय्येचा कार्यक्रम तो वेगळ्या उंचीवर नेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.