Savalyachi Janu Savali Upcoming Twist: सर्वांना मान-सन्मानाने वागवणारी, कमी बोलणारी, गोड आवाजात गाणे गाणारी; पण त्याबद्दल कोणालाही कळू न देणारी, माहेरच्या माणसांवर जीवापाड प्रेम करणारी आणि सासरच्यांचा आदर ठेवणारी, सारंगवर मनापासून प्रेम करणारी सावली प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसते.

सावलीच्या घरची परिस्थिती पहिल्यापासूनच बेताची आहे. तिला तिच्या गरीब परस्थितीची जाणीव आहे. अशातच भैरवी वझेला सावलीचे गाणे ऐकून एक कल्पना सुचते. तिची मुलगी गाणे गात आहे, असे भासवून पडद्याआड ती सावलीला गाणे गायला सांगते. त्या बदल्यात ती तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत करेन, असे वचन देते.

दरम्यानच्या काळात ती सावलीला गाण्याचे प्रशिक्षण देते. सावली उत्तम गायिका होते; मात्र तिच्या गायनामुळे जगासमोर भैरवीची मुलगी ताराच लोकप्रिय गायिका ठरली आहे. भैरवी व तारा नेमका याच परिस्थितीचा गैरफायदा घेतात आणि दोघीही सावली व तिच्या घरच्यांचा वेळोवेळी अपमान करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच ताराचे सावलीच्या दीराशी लग्न झाले आहे.

दोघीही एकाच घरात लग्न करून गेल्यानंतर तारा सावलीला सतत त्रास देण्याचा प्रयत्न करते. ऐश्वर्याच्या मदतीने तिच्याविरुद्ध कट-कारस्थान करताना दिसते. आता समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये मेहेंदळे कुटुंबासमोरच भैरवी व सावली एकमेकींविरुद्ध उभ्या राहिल्याचे दिसत आहे.

“माझ्याबरोबर बसून जेवायची….”

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर सावळ्याची जणू सावली मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, तिलोत्तमा, भैरवी, तारा, सावलीचे आई-वडील आणि घरातील इतर मंडळी एकत्र जेवायला बसले आहेत. सावली सगळ्यांना जेवण वाढत आहे. मात्र, सावलीच्या आई-वडिलांना जेवायला बसलेले पाहून भैरवीचा संताप होतो. ती मोठ्याने म्हणते, “ए उठ, माझ्याबरोबर बसून जेवायची तुझी लायकी आहे का? आजवर मी फेकलेल्या तुकड्यांवर तुम्ही पोसलात.”

भैरवीचे ते बोलणे ऐकूण सावलीचे आई-वडील उठतात. तिच्या बोलण्याचे त्यांना वाईट वाटते. तितक्यात तिथेच उभी असलेली सावली रागाने म्हणते, “माई, तुमच्या अशा वागण्यामुळे जर मी माझा शब्द मोडला ना, तर कोणाची लायकी कमी होईल, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे.” सावलीच्या त्या बोलण्याने तिलोत्तमाला धक्का बसल्याचे पाहायला मिळते.

आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.