Savalyachi Janu Savali upcoming twist: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळते. कधी सारंगवर संकट येते, कधी सावली सारंगसाठी त्याग करताना दिसते, कधी भैरवीला वचन दिल्याने तिचे सत्य सारंगला सांगत नाही, तर कधी तारा व ऐश्वर्या मिळून सावलीविरुद्ध कट कारस्थान करताना दिसतात.
ऐश्वर्या सारंगची वहिनी आहे. तिलोत्तमाची लाडकी सून आहे. मात्र, ऐश्वर्याला मेहेंदळे कुटुंबात तिलोत्तमाची जागा घ्यायची आहे, त्यामुळे ती अनेक कट कारस्थान करताना दिसते. तिच्या मोठ्या जावेला म्हणजेच अमृताला बाळ होऊ नये म्हणूनदेखील ती तिला तिच्या नकळत औषधे देते. याबरोबरच, सावली ही रंगाने गोरी नाही, श्रीमंत नाही म्हणून ऐश्वर्या आणि तिलोत्तमाला ती आवडत नाही, त्यामुळे मेहेंदळे कुटुंबातील तिलोत्तमा, तारा आणि ऐश्वर्या सावलीचा राग करतात; तर घरातील इतरांची मने सावलीने जिंकून घेतली आहेत.
या सगळ्यात सावलीने तिच्या गायनाचे सत्य सारंगला सांगितलेले नाही. सावली ताराची असिस्टंट नाही तर ती गाणे गाते आणि तारा त्यावर गाणे म्हणत असल्याचा अभिनय करते, हे वर्षानुवर्षे चालत आलेले आहे. त्यामुळे तारा लोकप्रिय गायिका म्हणून प्रसिद्ध आहे. आता मालिकेत ट्विस्ट आल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
‘सावळ्याची जणू सावली’मध्ये पुढे काय होणार?
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की जगन्नाथ सावलीला फोनवर सांगतो, “हे सत्य जर सारंगसमोर आलं, तर तो आनंदाने सर्व गोष्टी स्वीकारेल आणि मी त्याला जितकं ओळखतो, त्यावरून तितकं तो तुला कधीही दूर करणार नाही.”
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, अमृता गरोदर असल्याचे सावलीला वाटते. ती अमृताला डॉक्टरांकडे जाऊन गरोदरपणाची तपासणी करून घेण्याचा सल्ला देते. ते ऐकल्यानंतर ऐश्वर्याला धक्का बसतो.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सावलीची शंका खरी ठरेल का?”, अशी कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, आता सावली तिचे सत्य सारंगला सांगणार का, अमृता गरोदर आहे हे समजल्यानंतर ऐश्वर्या काय करणार, मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.