Savalyachi Janu Savali upcoming twist: जगू आजीच्या येण्याने ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. कडक शिस्तीची, स्वभावाच्या जगू आजीला तिलोत्तमापासून ते ऐश्वर्यापर्यंत सर्वजण घाबरत असल्याचे पाहायला मिळते.
‘सावळ्याची जणू सावली’ ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. सारंग व सावली यांची केमस्ट्री प्रेक्षकांना आवडते. सावली तिच्या प्रेमळ, समजूतदार स्वभावाने मेहेंदळे कुटुंबाप्रमाणेच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. तर, सारंग त्याच्या उच्च विचारांमुळे, जेव्हा सावली संकटात असेल तेव्हा तिच्या मदतीला येऊन तो प्रेक्षकांचा लाडका झाला आहे.
सावली व सारंगचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यांचा एकमेकांवर खूप विश्वास आहे. असे असले तरीही एक सत्य सावलीने सारंगपासून लपवून ठेवले आहे. ते म्हणजे- ज्या ताराला सर्व जण तिच्या गाण्यामुळे ओळखतात. खरेतर ते गाणे सावली गाते. पण, आजपर्यंत हे सत्य अगदी मोजक्या लोकांना माहीत झाले आहे.
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये सावली व ताराचे हे सत्य जगू आजीसमोर येणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘सावळ्याची जणू सावली‘ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दिसते की आजी एक गाणे ऐकत आहे. ते गाणे ऐकून ती मंत्रमुग्ध होते. सोहम तिला सांगतो की, आजी हे गाणं ताराने गायलं आहे. ते ऐकून आजी आश्चर्य व्यक्त करते. ती त्याला म्हणते की मी डोक्यावर पडले होते असे तुला वाटते का?
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की तारा, सावली व आजी एका खोलीत झोपण्यासाठी गेल्या आहेत, पण आजीच्या घोरण्यामुळे तारा आणि सावलीला झोप येत नाही. ताराची चिडचिड होते. ती सावलीला गाणे गाण्यास सांगते. ती सावलीला म्हणते की हे बघ सावली, मी तुला ऑर्डर देते असं समज; तू गाणं गा. या भोंग्यात थोडी तरी शांतता मिळेल. त्यानंतर सावली गाणे गाते. तिच्या आवाजाने आजी उठते आणि हळूच त्या दोघींकडे बघते. आजीला झोपेतून उठलेलं पाहून तारा आणि सावली दोघी घाबरतात.
हा प्रोमो शेअर करताना आजी मान्य करेल का सावलीच्या गोड गळ्याचं सत्य? अशी कॅप्शन दिली आहे. आता सावलीचे सत्य आजी सर्वांसमोर सांगणार का? जेव्हा सावलीच्या गाण्याचे सत्य सारंगला समजेल तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.