Savalyachi Janu Savali: ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील सावली व सारंग यांची मैत्री प्रेक्षकांना भुरळ घालतेय. सारंगच्या आईला तिलोत्तमाला सावली आवडत नाही. मात्र, तरीही सारंग सावलीला वेळोवेळी साथ देत असल्याचे पाहायला मिळते.

सारंगला ताराचे गाणे खूप आवडते. तो तिच्या गाण्याचा चाहता आहे. मात्र, खरे तर तो आवाज सावलीचा आहे. तारा गाण्याचे नाटक करते आणि सावली गाते. हे सत्य फक्त सावली, तिच्या कुटुंबाला, जगन्नाथ, भैरवी व तारा यांनाच माहीत आहे. आता मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर सारंगपुढे हे सत्य येणार का, अशी उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे.

सावलीच्या आवाजाचे सत्य सारंगसमोर येणार?

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, भैरवी सावलीला सांगते, “ही स्पर्धा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. विशेषत: तारासाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे.” पुढे या प्रोमोमध्ये स्पर्धेच्या ठिकाणची गडबड पाहायला मिळते. जगन्नाथ या स्पर्धेच्या परीक्षक पदी आहे. श्रोता म्हणून सांरगदेखील हजर आहे. तारा व दुसऱ्या एका स्पर्धकाचा एकत्र गाण्याचा परफॉर्म असल्याची घोषणा केली जाते. त्यानंतर गाणे सुरू होते.

भैरवी जगन्नाथला म्हणते की, तू कितीही प्रयत्न कर. तुला कळणारच नाही की सावली कुठून गाते? यादरम्यानच, सावली ज्या खोलीतून गात असते, त्या खोलीचा दरवाजा ठोठावल्याचा आवाज येतो. सावली गडबडीत माईक आणि इतर गोष्टी एका कपड्याखाली लपवते. ती दरवाजा उघडते. तर तिला समोर सारंग उभा असल्याचे दिसते. सारंगला पाहिल्यानंतर सावलीला धक्का बसल्याचे दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘सारंगला आवडणाऱ्या आवाजाचा शोध पूर्ण होणार का?’, अशी कॅप्शन दिली आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सावली ही गरीब घरातील मुलगी असल्याचे पाहायला मिळते. तिचा आवाज छान आहे. याचाच गैरफायदा भैरवी घेते. ती सावलीच्या घरच्यांना त्यांच्या मुलाच्या आजारपणासाठी पैसे देते. त्या बदल्यात सावलीचा आवाज गहाण ठेवते. त्यामुळे सावलीला इतर ठिकाणी गाता येत नाही. ती फक्त भैरवीची मुलगी तारासाठी गाणे म्हणू शकते. संपूर्ण जगाला तो आवाज ताराचा असल्याचे वाटते.

दरम्यान, आता सारंगला सावलीच्या आवाजाचे सत्य समजणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.