Shiva Upcoming Twist: ‘शिवा’ मालिका काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. शिवाचा जवळचा मित्र रॉकीचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर शिवाचे आयुष्य बदलल्याचे पाहायला मिळाले.

शिवा या मालिकेत दाखविल्याप्रमाणे शिवा ही धाडसी आहे. अन्याय न सहन करणारी, आपल्या माणसांसाठी काहीही करायला तयार असणारी अशी ही शिवा अनेकदा गुंडांशी मारामारीदेखील करते. आशूला फसवल्यामुळे शिवाने सुहासला म्हणजेच कीर्तीच्या नवऱ्याला घराबाहेर काढले होते. त्याला सगळ्यांसमोर मारलेदेखील होते. त्यानंतर सुहासने शिवाला मारण्यासाठी त्याच्या आईबरोबर मिळून योजना बनवली.

ज्या दिवशी रॉकी आणि संपदाचा साखरपुडा होता. त्याच दिवशी सुहासने शिवाला मारण्याची योजना आखली. जेव्हा शिवा रॉकीला साखरपुड्यासाठी आणण्यासाठी जात होती. त्यावेळी तिचा अपघात घडवून आणण्याचे सुहासने ठरवले. त्यातच शिवाला वाचवताना रॉकीचा मृत्यू झाला. त्यानंतर शिवाच्या मनात अपराधीपणाचा भाव होता. जवळच्या माणसाला गमावल्याचे दु:ख, भीती तिच्या मनात होती. कायम उत्साही असणारी शिवा शांत राहू लागल्याचे पाहायला मिळाले.

शिवा मालिकेत पुढे काय होणार?

आता मात्र जुनी शिवा पुन्हा परतणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे. झी मराठी वाहिनीने शिवा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. त्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, एका दुकानाबाहेर आशू आणि पाना गँगचे कोणाबरोबर तरी भांडण होते. गुंड त्याच्याशी मारामारी करतात. पण, या सगळ्यात आशूला हे सुचते की, तो आणि पाना गँग संकटात असल्यानंतर शिवा त्याला मदत करण्यासाठी धावून येईल. तो पाना गँगमधील एकाला शिवाला बोलावण्यासाठी पाठवतो.

शिवा जेव्हा आशूला गुंडांपासून वाचविण्यासाठी जात असते, तेव्हा तिला रॉकीचा मृत्यू आठवतो; पण तिचे वडील तिला भीतीवर मात करून पुढे जाण्याची हीच संधी असल्याचे सांगत असल्याचा तिला भास होतो. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, शिवा आशूला वाचविण्यासाठी जाते. गुंडांना मारून ती आशू व पाना गँगला वाचवते. आता हा प्रोमो शेअर करीत झी मराठी वाहिनीने ‘दु:ख मागे सारून शिवा कमबॅक करणार’, अशी कॅप्शन दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता रॉकीच्या मृत्यूला सुहास जबाबदार असल्याचे शिवाला समजणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.