Shiva Upcoming twist: ‘शिवा’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील शिवा, आशू, सिताई, रामभाऊ, कीर्ती, सुहास, पाना गँग, दिव्या, बाईआजी अशी सगळीच पात्रे त्यांच्यातील विविधतेमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, काही दिवसांपूर्वीच शिवाचा जवळचा मित्र रॉकीचा मृत्यू झाला. त्या दिवशी रॉकीचा शिवाची नंणद संपदाबरोबर साखरपुडा होता, त्यासाठी शिवा त्याला स्वत: आणण्यासाठी जात होती. मात्र, याचवेळी शिवाचा अपघात घडवून आणायचा आणि तिला मारून टाकायचे असे सुहास व त्याच्या आईने योजना आखली. याबद्दल रॉकीला समजले, त्यामुळे शिवाचा जीव वाचवण्यासाठी त्याने स्वत:चा जीव धोक्यात घातला.
या सगळ्यात शिवा वाचली, मात्र रॉकीला त्याचा जीव गमवावा लागला. त्याचा शिवा व संपदा दोघींवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. यातून सावरल्यानंतर नीट विचार केल्यानंतर हा अपघात नसून कोणीतरी जीवे मारण्याची योजना केली होती हे शिवाच्या लक्षात आले. त्यासाठी ती गेल्या काही दिवसांपासून यामागे कोण खरा सूत्रधार आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आता समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये शिवाच्या हाती काही पुरावे आल्याचे पाहायला मिळत आहे.
‘शिवा’ मालिकेत पुढे काय घडणार?
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते शिवा व आशू हे पोलिस ठाण्यात गेले आहेत. आशू पोलिसांना सांगतो की काल रात्री कोणीतरी गॅरेजमध्ये शिरलं आणि पुरावा चोरून घेऊन गेलं. त्यावर पोलिस म्हणतात की ज्या माणसाने तो खून केला आहे, त्यानेच तो पुरावा पळवून नेला आहे.
पुढे दिसते की सुहास त्याच्या आईला सांगतो की पोलिसांना त्या ड्रायव्हरचा नंबर सापडला आहे. ड्रायव्हर जर पोलिसांच्या हाती लागला तर… प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, पाना गँगमधील एक मुलगा शिवाला फोन करतो. तो शिवाला सांगतो, “शिवा, मला त्या ड्रायव्हरचं लोकेशन मिळालं आहे”, त्यावर शिवा म्हणते, “आता मी त्या ड्रायव्हरला सोडत नाही,” हे म्हणताना शिवा रागात दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “शिवा रॉकीच्या खुन्यापर्यंत पोहोचणार का?”, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट करून शिवाला प्रोत्साहन दिल्याचे पाहायला मिळत आहे. “एकच नंबर शिवा. फक्त आता त्या सुहासने काही करायला नको. शिवा, त्या ड्रायव्हरला तू नको सोडू”, “हेच व्हायला हवं. हे आधीच होणं अपेक्षित होतं. पण, आता उशीर नका करू”, “आता सुहास, शांताबाई आणि त्या ड्रायव्हरची वरात काढ”, “या मायलेकांचे सत्य आता तरी समोर आलेच पाहिजे”, “शिवाने जे ठरवलं ते ती करूनच दाखवते”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.




दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.