Shiva Upcoming Twist: चित्रपट, मालिका व वेब सीरिजमधील काही पात्रे ही त्यांच्या वेगळेपणामुळे गाजतात. विशेष बाब म्हणजे ही पात्रे वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. अशाच काही पात्रांपैकी शिवा ही भूमिका आहे.
झी मराठी वाहिनीवरील ‘शिवा’ ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील शिवा तिच्या वेगळेपणामुळे लोकप्रिय ठरली आहे. छोटे केस असलेली, तितकीच प्रेमळ, आपल्या माणसांसाठी काहीही करायला तयार असणारी, कुटुंब जोडून ठेवणारी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी, बुलेटवरून फिरणारी, प्रसंगी गुंडांबरोबर मारामारी करणारी ही शिवा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.
शिवाने सिताईचे मन जिंकले; मात्र कीर्तीने दिव्या व जगदीशला हाताशी धरून प्लॅन बनवला. त्याप्रमाणे जगदीशने शिवाच्या घरावर ताबा मिळवला आणि तिच्या आई व आजीला बाहेर काढले. त्यानंतर तिची आई, आजी, दिव्या व चंदन हे शिवाच्या सासरी राहायला आले. त्यानंतर कीर्तीने घरात फूट पाडण्याची योजना बनवली. दिव्याने आशूच्या उर्मिलाकाकूमुळे तिचा गर्भपात झाला आहे, असा आरोप केला. त्यानंतर घरातील वातावरण बिघडल्याचे पाहायला मिळाले. आता मात्र मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवा जगदीशला घरातून धक्के मारून बाहेर काढणार
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, शिवाच्या घरापुढे पाना गँग आली आहे. ते जगदीशला उद्देशून म्हणतात की, घेतला कोणाशी पंगा, ए चोरा आता करणार ना दंगा, दिवस भरलेत तुझे. त्यानंतर पाहायला मिळते की, शिवा येते. तिच्या हातात तिच्या वडिलांचा फोटो आहे.
प्रोमोमध्य़े पुढे पाहायला मिळते की, शिवा घरात जाते. ती तिच्या काकाला म्हणजेच जगदीश कॉलरला धरून सांगते, ए जगदीश पाटील. हे घर कैलास पाटीलचं होतं, आताही त्यांचंचं आहे आणि पुढेही त्यांचंच राहणार. पुढे ती जगदीशला धक्का मारून घराबाहेर काढते. तो बाईआजीच्या पायावर पडतो. बाई जी जगदीशला म्हणते, “ए मुडद्या, ही शिवा आहे शिवा. दिलेला शब्द मोडत नाही आणि ठेवलेला भरोसा तोडत नाही.” त्यानंतर शिवा आनंदाने बाईआजीच्या हातात घराची चावी देताना दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने ‘जगदीशकाकाला घरातून धक्का मारून बाहेर काढणार आपली शिवा’, अशी कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, आता कीर्ती व दिव्याचेदेखील सत्य बाहेर येणार का, शिवा सासरच्या घरात कुटुंबामध्ये मतभेद झालेत, ते दूर करू शकणार का, मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.