Shiva Upcoming Twist: ‘शिवा’ या मालिकेत सध्या विविध ट्विस्ट येताना दिसत आहेत. सुहास आणि शिवा यांच्यामध्ये वैर असलेले पाहायला मिळते. शिवामुळे सुहासला देसाई कुटुंबातून अपमानित होऊन बाहेर पडावे लागले होते.
झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सुहासने शिवाला जीवे मारण्याची योजना आखली. पण, सुहासच्या या कारस्थानाबद्दल रॉकीला समजले. शिवाला वाचवण्यासाठी रॉकीने स्वत:चा जीव धोक्यात घातला. शिवाला वाचवताना रॉकीचा मृत्यू झाला. शिवा व रॉकी हे एकमेकांच्या अगदी जवळचे होते. वस्तीत वाढलेले, एकमेकांप्रति आपुलकी असलेली, एकमेकांवर जीव असलेले शिवा व रॉकी एकमेकांपासून कायमचे दुरावले.
रॉकीच्या मृत्यूचा शिवाला धक्का बसला. जेव्हा ती या दु:खातून सावरली, त्यावेळी रॉकीच्या मृत्यूमागे कट कारस्थान असल्याचे तिच्या लक्षात आले, त्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून पुरावे शोधत होती.
शिवा गेल्या काही दिवसांपासून रॉकीचा मृत्यू ज्या ट्रकच्या धडकेत झाला त्याचा शोध घेत होती. मात्र, शिवा सुहासच्या जाळ्यात अडकणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सुहास त्या ट्रक ड्रायव्हरला भेटतो. त्याला काही पैसे देतो आणि त्याला तिथून कायमचं जा, असे सांगतो. तो ड्रायव्हर पैसे घेऊन जात असतो, तितक्यात सुहास त्याला थांबवतो आणि म्हणतो की तुला हे पैसे मोजायचे नाहीत का? सुहासचे बोलणे ऐकून तो ड्रायव्हर पैसे मोजू लगातो.
ड्रायव्हर पैसे मोजण्यात मग्न असलेला पाहून सुहास त्याच्या पाठीमागून येतो आणि चाकूने त्याच्यावर वार करून त्याचा खून करतो. तितक्यात शिवा तिथे येते. सुहास तिथून गायब होतो. शिवा त्या खोलीत येते. तिथे त्या ड्रायव्हरचा मृतदेह पाहते. तिथे पडलेला चाकू ती उचलते, तितक्यात पोलिस तिथे येतात. त्या ड्रायव्हरचा खून शिवानेच केला आहे, असा त्यांचा समज होतो. ते तिला अटक करतात.
प्रोमोमध्ये पाहायला मिळते, शिवाला तुरुंगात टाकले आहे. तिथे रामभाऊ आणि आशू येतात. रामभाऊ पोलिसांना म्हणतात की, साहेब तुम्ही गुन्हेगाराला सोडून तिला आत टाकलं आहे. त्यावर पोलिस रामभाऊंना म्हणतात की त्यांनी जर रागावर नियंत्रण ठेवलं असतं तर ही घटना घडली नसती.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने सुहासच्या जाळ्यात निष्पाप शिवा अडकणार का? अशी कॅप्शन दिली आहे. आता आशू शिवाला कसे निर्दोष सिद्ध करणार, सुहासचा गुन्हा कधी सर्वांसमोर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.